दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले असताना सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो म्हणून अनेक असंबंधित व जुने फोटो शेयर होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीसुद्धा अनेक फोटोंची सत्य समोर आणलेले आहे.

असेच आणखी काही फोटो फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

काय आहे दावा?

दिल्लीत रात्रीच्या गारठ्यात आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांचे फोटो म्हणून पुढील फोटो शेयर करण्यात येत आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

प्रत्येक फोटोची एक-एक करीत पडताळणी केली असता कळाले की, हे फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नाहीत. हे सगळे फोटो जुने आहेत.

फोटो क्र. 1

सत्य – हा फोटो 2018 मध्ये मुंबईत आलेल्या ‘लाँग मार्च’मधील आहे. पी. साईनाथ यांनी सुरू केलेल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया वेबसाईटवर हा फोटो आढळला. त्यातील माहितीनुसार, 12 मार्च 2018 हा फोटो मुंबईतील आझाद मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांचा आहे. श्रीरंग स्वर्गे यांनी हे छायाचित्र टिपले होते. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर 12 मार्चला पहाटे आझाद मैदानात दाखल झाले होते.

स्रोत - पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया


फोटो क्र. 2

सत्य – हा फोटो चक्क 11 वर्षांपूर्वीचा आहे. किमान आठ तास वीज आणि तीसुद्धा कमी दरात देणे या मागणीसाठी चंदीगढमध्ये 7 सप्टेंबर 2009 शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते. अलामी या स्टॉक फोटो वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. त्यावरील माहितीनुसार, छायाचित्रकार अजय वर्मा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी हा फोटो काढला होता.

स्रोत – Alamy Stock Photo


फोटो क्र. 3

सत्य – हा फोटो 2017 मधील आहे. अखिल भारतीय किसान सभेतर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात राजस्थानमधील सीकर शहरात तत्कालिन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा निषेध करण्यासाठी 4 सप्टेंबर 2017 रोजी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. हा त्या अंत्ययात्रेचा फोटो आहे.

स्रोत – फॅक्ट क्रेसेंडो


फोटो क्र. 4

सत्य – पुलावरून लालझेंडे घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांचा फोटो 2018 मधील आहे. ANI वृत्तसंस्थेने या मोर्चाचा व्हिडिओ 30 नोव्हेंबर 2018 रोजी शेयर करून माहिती दिली होती की, कर्जमाफी व किमान विक्रीमूल्य निश्चित करणे यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीमध्ये आले होते. हा त्या आंदोलनाचा हा फोटो आहे.

स्रोत – ANI


निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, जुने व असंबंधित फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नाहीत. परंतु, हेदेखील तितकेच खरे आहे की, अद्यापही हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. फक्त हे फोटो त्यांचे नाहीत.

Avatar

Title:जुने व असंबंधित छायाचित्रे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: Misleading