काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या म्हणतात की, “रुद्राक्ष व तुळशी माळा, पवित्र धागा, विना ब्रँडचे मध, कलावा (पवित्र धागा), विभूती, चंदनचा टिका, दिव्याची वात आणि लाकडी चप्पल इत्यादी पूजा साहित्यांवर जीएसटी कर लावला जात नाही.”

या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, सुप्रिया श्रीनेत या पुजासामग्रीवर जीएसटी का लावण्यात आले नाही ? असा सरकारला सवाल करत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात सुप्रिया श्रीनेत या गंगजलवर लावलेल्या जीएसटीवर भाजप सरकारला प्रश्न विचारत होत्या.

काय आहे दावा ?

व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेसचे मोठे दु:ख म्हणजे पूजा साहित्यावर जीएसटी का नाही?”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ एका पत्रकार परिषदेचा आहे. सुप्रिया श्रीनाते यांनी 17 ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती.

काँग्रेसने अधिकृत फेसबुक पेजवर या परिषदेचे थेट प्रक्षेपण केले होते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी सरकारला पवित्र गंगा जलवरून जीएसटी काढण्यास भाग पाडल्याबद्दल काँग्रेस पक्षाची माहिती.”

वरील संपुर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, या ठिकाणी सुप्रिया श्रीनेत पूजा सामग्रीवर जीएसटी न लावल्याबद्दल सवाल करत नाही. या उलट त्या गंगा जलवर लावलेल्या कथित 18 टक्के जीएसटी लावल्यावर केंद्र सरकारवर हल्लाबोल करत होत्या.

सुप्रिया श्रीनेत म्हणतात की, “केंद्र सरकार जीएसटी आकारून गंगाजल विकत होते. काँग्रेसच्या विरोधानंतर सरकारने हा निर्णय बदलला. पूजा साहित्यावर जीएसटी नाही. हे देखील एक उघड खोटे आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळच्या (सीबीआयसी) वेबसाईटनुसार रुद्राक्ष व तुळशी माळा, पवित्र धागा, विना ब्रँडचे मध, कलावा (पवित्र धागा), विभूती, चंदनचा टिका, दिव्याची वात आणि लाकडी चप्पल इत्यादी गोष्टींवर जीएसटी आकारण्यात येत नाही. परंतु, सीबीआयसी वेबसाईटवरील यादीत गंगाजल वगळता इतर 10 पुजासामग्रींचा उल्लेख आढळतो,”

पुढे त्या म्हणतात की, “काँग्रेसने या बद्दल विरोधात सवाल केल्यावर भाजप सरकारला गंगाजलवरील जीएसटीचा निर्णय माघे घ्यावा लागला.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 12 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांना उल्लेख ट्विट केले की, “उत्तराखंडमध्ये भाजप सरकारने पवित्र गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावले आहे.”

https://twitter.com/kharge/status/1712350199920644418?s=20

यानंतर सीबीआयसीने 12 ऑक्टोबर ट्विट करत स्पष्ट केले की, “18/19 मे 2017 आणि 3 जून 2017 रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या अनुक्रमे 14 व 15 व्या बैठकीमध्ये पूजासमाग्रीवरील जीएसटीवर तपशीलवार चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत एक सूट यादी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये इतर पुजासामग्रीसोबत गंगाजलचा ही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जीएसटी लागू झाल्यापासून या पुजासामग्रीवर सूट देण्यात आली आहे.”

https://twitter.com/cbic_india/status/1712402263745114185?s=20

या ठिकाणी फॅक्ट क्रेसेंडो गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आले होते किंवा नाही, याची पुष्टी करत नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. सुप्रिया श्रीनेत प्रसार माध्यमासमोर पुजासामग्रीवर जीएसटी नसल्यामुळे विरोध करत नव्हत्या. मूळात त्या भाजप सरकारद्वारे गंगाजलवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याचा अरोप करत होत्या.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सुप्रिया श्रीनेत यांनी पुजासामग्रीवर जीएसटी का नाही असा सवाल केला नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading