रेल्वेने ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे केलेली नाही. ते 58 वर्षेच आहे. वाचा सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजनुसार रेल्वेने महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक म्हणून वयोमर्यादा 45 वर्षे केली आहे. याचा अर्थ की, 45 वर्षांपेक्षा पुढील महिलांना ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळणार. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना तिकिटामध्ये 40 टक्क्यांची सवलत मिळेल, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा मेसेज पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली. यासंबंधी तपास केला असता हा मेसेज खोटा असल्याचे निष्पण्ण झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मेसेजमध्ये लिहिले आहे की, Railway सेवेमध्ये महिलांसाठी Sr. Citizen म्हणुन 45 वय घोषित केले आहे. म्हणजे आता वय वर्ष 45 असलेली स्त्रीला रेल्वे प्रवासासाठी 40% सवलत मिळणार आहे. सोबत रेल्वेचे पीडीएफ पाठवित आहे.

सोबतच्या पीडीएफ फाईलमध्ये 2 पाने असून, रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या जाणाऱ्या सुविधांची यामध्ये माहिती आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथ मेसेजसोबत असणाऱ्या पीडीएफची तापसणी केली. इंग्रजी भाषेतील या दस्तऐवजामध्ये कुठेही ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी वयोमान 45 वर्षे केल्याचा उल्लेख नाही.

मग खरं काय?

भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या सुविधा दिल्या जातात याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिक म्हणून पुरुषांसाठी 60 वर्षे तर महिलांसाठी 58 वर्षे वयोमर्यादा आहे. म्हणजे 58 व त्यापेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवशांनाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा व सवलती मिळतील.

विशेष म्हणजे ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी रेल्वे तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. व्हायरल मेसेजमध्ये तरी 40 टक्के म्हटले आहे. वास्तवात त्यापेक्षा जास्तच सवलत मिळते.

मूळ माहिती येथे वाचा – IRCTC

मग मेसेज सोबत दिलेली पीडीएफ कुठून आली व त्यात काय आहे?

Facilities Extended To Senior Citizens नावाची ही पीडीएफ भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यात म्हटलेय की, ऑनलाईन तिकिट बुक करते वेळी 45 वर्षांवरील महिला प्रवाशांना ‘लोअर बर्थ’ देण्यात येतील. म्हणजे जर ऑनलाईन तिकिट बुक करताना जर बर्थचा पर्याय (लोअर, मिडल, अपर) निवडलेला नसेल, तर 45 वर्षांवरील महिला प्रवाशांसाठी आपोआप ‘लोअर बर्थ’ देण्यात येईल. लक्षात घेण्यासारखी बाबा म्हणजे, येथे तिकिट दरात सवलत मिळत नाही. केवळ जागा आरक्षित करण्यासाठी हा सुविधा आहे. ‘जनसत्ता’ वेबसाईटवर हिंदी भाषेतून हे नियम वाचू शकता. 

मूळ पीडीएफ येथे पाहा – भारतीय रेल्वे

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, रेल्वेने महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकत्वाचे वयोमान 45 वर्षे केलेले नाही. त्यामुळे 45 ते 58 दरम्यान वयोमान असलेल्या महिला प्रवशांना ज्येष्ठ नागरिकांसाठीची तिकिटदरात सवलत दिली जाणार नाही. रेल्वेमध्ये ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी वयाची अट 58 वर्षे आहे. त्यावरील महिला प्रवाशांना तिकिटदरात 50 टक्के सूट मिळते.

Avatar

Title:रेल्वेने ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे केलेली नाही. ते 58 वर्षेच आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False