LOK SABHA 2019: मोदींविरोधात लढणाऱ्या तेज बहादुर यादव यांच्या प्रचारासाठी खरंच येणार 10 हजार सैनिक?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारतीय सैन्याला मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाचे सत्य व्हिडियोद्वारे समोर आणणारे बीएसएफचे माजी-जवान तेज बहादुर यादव यांनी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चर्चेत आलेल्या तेज बहादुर यांच्याविषयी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरवली जात आहे. यात म्हटले की, त्यांच्या प्रचारासाठी सुमारे दहा सैनिक वाराणसीमध्ये दाखल होणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये तेज बहादुर यादव व भारतीय सैनिकांचा फोटो शेयर करून हिंदीतून लिहिले की, बनारस में मोदी के खिलाफ लडने वाले तेज बहादुर यादव के प्रचार में दस हजार सैनिक आ रहे है. भक्तों अब बताओं देशद्रोही कैन है? (वाराणसीमध्ये मोदींविरोधात लढणारे तेज बहादुर यादव यांच्या प्रचारासाठी दहा हजार सैनिक येत आहेत. भक्तांनो! आता सांगा देशद्रोही कोण आहे?)

तथ्य पडताळणी

भारतीय सैनिकांना निवडणूक प्रचार करण्याची परवानगी आहे का, याची फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम तपासणी केली.

भारतीय सैन्याला ‘द आर्मी अ‍ॅक्ट, 1950’ हा कायदा लागू होतो. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर या कायद्याचा मजकूर उपलब्ध आहे. यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार, सैन्यात भरती झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या काही मूलभूत अधिकारांवर केंद्र सरकारला अधिसूचना काढून बंधन आणण्याचे अधिकार देण्यात आला आहे. कार्यरत सैनिकाच्या राजकीय कार्यक्रम/बैठकीला संबोधित/उपस्थित राहण्याच्या अधिकाराचा यामध्ये समावेश आहे.

मूळ कायदा येथे वाचा – द आर्मी अ‍ॅक्टअर्काइव्ह

‘द आर्मी अ‍ॅक्ट’नुसार केंद्र सरकारने 1954 साली एक अधिसूचना काढून सैन्याचे काही नियम तयार केले होते. त्याला ‘द आर्मी रुल्स, 1954’ असे म्हणतात. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर ते उपलब्ध आहेत. यामधील प्रकरण चारमध्ये सैनिकांच्या मूलभूत अधिकारांवरील बंधने दिली आहेत.

त्यानुसार, सैनिकांना कोणत्याही राजकीय कार्यक्रम/बैठकीला उपस्थित, संबोधित किंवा सहभागी, तसेच कोणत्याही राजकीय पक्ष/मोहिमेचा प्रत्यक्ष सदस्य होण्यास मनाई करण्यात आली आहे.

मूळ नियम येथे वाचा – द आर्मी रुल्सअर्काइव्ह

यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय सैन्यात कार्यरत सैनिकांना (Active Military Personnel) कोणत्याही राजकीय कार्यक्रमात किंवा प्रचारासाठी काम करण्यास परवानगी नाही.

मग हा नियम डावलून दहा हजार सैनिक तेज बहादुर यादव यांच्या प्रचारासाठी येत आहेत का?

तेज बहादुर रविवारी (7 एप्रिल) वाराणसी येथे गेले होते. तेथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नवभारत टाईम्स वृत्तस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, तेज बहादुर यांनी मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी दहा हजार माजी सैनिक (पूर्व सैनिक) येत असल्याचे वक्तव्य केले होते. ते माजी सैनिक म्हणाले. असे सैनिक जे सध्या सैन्यात नाहीत.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्सअर्काइव्ह

द वायर या वेबसाईटला 11 एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्येदेखील तेज बहादुर यांनी त्यांच्यासोबत माजी सैनिक (Ex-Servicemen) असल्याचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी दहा ऐवजी आता 50 हजार माजी सैनिकांचे त्यांना समर्थन असल्याचे म्हटले आहे.

मूळ मुलाखत येथे वाचा – द वायर इंग्लिशद वायर हिंदी

निष्कर्ष

‘द आर्मी अ‍ॅक्ट-1950’, आणि ‘द आर्मी रूल्स-1954’ मधील तरतुदींनुसार सैनिकांना राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. तसेच तेज बहादुर यांनी दहा हजार माजी सैनिकांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाराणसीमध्ये दहा हजार सैनिक प्रचार करण्यासाठी येत असल्याचा दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:LOK SABHA 2019: मोदींविरोधात लढणाऱ्या तेज बहादुर यादव यांच्या प्रचारासाठी खरंच येणार 10 हजार सैनिक?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •