तथ्य पडताळणी: काँग्रेस आणि भाजप सरकारची ही तुलना खरी आहे का?

False राजकीय राष्ट्रीय

एका युजरने फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉटस्अपवर पाठविलेल्या फोटोमध्ये दावा करण्यात आला आहे की, भाजप सरकारच्या काळात दहशतवाद फोफावला असून काँग्रेसच्या राजवटीमध्ये असणारी शांतता भंग पावली आहे. दहशतवादाला आळा घालण्यात भाजप सरकार काँग्रेसच्या तुलनेत अपयशी ठरल्याचे या पोस्टमधील आकडेवारीवरून दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली.

सदरील फोटो फेसबुकवरदेखील उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. या फोटोत यूपीए-2 (2009-14) आणि एनडीए (2014-2019) सरकारच्या काळात झालेले दहशतवादी हल्ले, त्यात मृत झालेले जवान व नागरिक आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन याची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी साऊथ एशिय टेररिझम पोर्टलवरून घेतल्याचे म्हटले आहे. युपीएच्या काळात दहशतवादी कारवाया कमी होत्या. तसेच एनडीए सत्तेत आल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे या आकडेवारीवरून दिसते.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने वरील आकडेवारीची साऊथ एशिया टेररिझम पोर्टल (एसएटीपी) या वेबसाईटवरील आकडेवारीशी सांगड घालून तपासणी केली. आशिया खंडातील दहशतवादी कारवायांसंबधी आकडेवारी गोळा करण्याचे आणि त्याचे विश्लेषण करण्याचे काम ही वेबसाईट करते. त्याबद्दल अधिक येथे वाचा – एसएटीपीअर्काइव्ह

1. मृत जवानांची संख्या

पोस्टमध्ये युपीएच्या दुसऱ्या टर्ममध्ये 139 जवानांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तोच आकडा एनडीएच्या काळात 483 वर पोहचला. परंतु, एसएटीपीवर उपलब्ध आकडेवारीनुसार युपीए-2 काळात 1328 जवान शहीद झाले होते. एनडीएच्या काळात 908 जवानांचा दहशतवादी कारवायांमध्ये मृत्यू झाला होता. हे आकडे पोस्टमधील आकडेवारीशी विसंगत आहेत.

मूळ आकडेवारी येथे पाहा – एसएटीपी अहवालअर्काइव्ह

2. मृत पावलेले नागरिक

पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, यूपीए-2 काळात केवळ 12 नागरिक दहशतवादाचे बळी ठरले. मात्र, 2014 पासून एनडीए सत्तेत आल्यापासून 210 नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. एसएटीपीच्या वेबसाईटवरील आकडेवारी मात्र वेगळीच आहे. तुम्ही वर दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, यूपीए-2 मध्ये 2463 नागिरक दहशदवादी कारवायांमध्ये मृत्यूमुखी पडले. हाच आकडा एनडीएच्या काळात 1241 इतका होता. म्हणजे पोस्टमधील आकडेवारी एसएटीपीच्या अधिकृत आकडेवारीशी मेळ खात नाही.

3. शस्त्रसंधीचे उल्लंघन

पोस्टमधील ग्राफिकमध्ये यूपीए-2 सरकारच्या काळात 563 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन (Cease-fire Agreement (CFA) Violation) करण्यात आले. तेच प्रमाण एनडीए सत्तेत आल्यापासून 5596 पर्यंत वाढले. म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये गेल्या सरकारच्या तुलनेत दहापट वाढ झाली.

एसएटीपीची आकडेवारी मात्र या दाव्याला खोटे ठरविते. मूळ आकडेवारीनुसार यूपीए-2 मध्ये 628 वेळा तर एनडीएमध्ये 4370 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.

मूळ आकडेवारी येथे वाचा – CFA Violationअर्काइव्ह

4. दहशतवादी हल्ले

पोस्टमधील आकडेवारी सांगते की, यूपीए-2 सरकारच्या काळात 109 दहशतवादी हल्ले झाले होते. एनडीएच्या काळात हेच प्रमाण 626 एवढे होते.

एसएटीपी वेबसाईटवर यासंबंधी देशपातळीवरील आकडेवारी आढळली नाही. त्यामुळे आम्ही केंद्रीय गृहखात्याचा आकडेवारी तपासली. या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये 1708 दहशतवादी हल्ले झाले.

मूळ आकडेवारी येथे पाहा – गृह खातेअर्काइव्ह

निष्कर्ष

पोस्टमध्ये एसएटीपीच्या आधारे दिलेली आकडेवारी मूळ वेबसाईटवरील आकडेवारीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी: काँग्रेस आणि भाजप सरकारची ही तुलना खरी आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False