हा खरंच 201 वर्षांच्या समाधिस्थ बौद्ध भिक्खूंचा फोटो आहे का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर एका भिक्खूचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ते 201 वर्षांचे जगातील सर्वात वृद्ध मानले जाणारे तिबेटी बौद्ध भिक्खू असून नेपाळमधील पर्वतांमध्ये ध्यानस्थ होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. हा फोटो थायलंडमधील 92 वर्षांच्या भिक्खूंचा आहे.

काय आहे दावा?

गणवेशधारी लोक एका भिक्खूला पकडून उभा असल्याचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वयाच्या २०१ व्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध मानले जाणारे तिबेटी बौद्ध भिक्खू नेपाळच्या पर्वतांमध्ये सापडले आहे. असे सांगितले जाते कि ते 201 वर्षाचे आहेत म्हणून. ते खोल समाधीच्या किंवा ध्यानाच्या अवस्थेत असतात ज्याला “ताकाटेट” म्हणतात. जेव्हा यांना पहिल्यांदा डोंगराच्या गुहेत शोधले तेव्हा लोकांना वाटले की ती एक ममी आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे कळाले की, हा फोटो थायलंडमध्ये 2017 साली निधन झालेल्या एका भिक्खूंचा आहे. 

डेली मिररच्या बातमीनुसार, Luang Phor Pian असे त्यांचे नाव होते. 16 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले होते. प्रथेनुसार दोन महिन्यांनी त्यांचे शव बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.

मूळ बातमी – डेली मिरर

Pian हे मूळचे कंबोडियामधील होते. परंतु, त्यांची संपूर्ण कारकीर्द थायलंडमध्ये गेली. तेथील लोपपूर भागात ते प्रसिद्ध बौद्ध गुरू होते. बँगकॉक येथील दवाखान्यात त्यांचे निधन झाले होते.

ते ज्या मंदिरात गुरू होते तेथेच त्यांना दफन करण्यात आले होते. प्रथेनुसार त्यांची वस्त्रे बदलण्यासाठी त्यांचे शव बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते, असे मेट्रो यूके वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

मूळ पोस्ट – मेट्रो यूके

मंगोलियामध्ये 2015 साली एका बौद्ध भिक्खूंचे 201 वर्षे जुने शव सापडले होते. ध्यानस्थ मुद्रेत बसलेले हे भिक्खू ‘तुकदम’ नावाच्या एका अध्यात्मिक स्थितीमध्ये दिसत आहेत. 

मूळ बातमी – इंडिपेडंट

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हायरल फोटो 201 वर्षांच्या बौद्ध भिक्खूंचा नाही. तो थायलंडमधील 92 वर्षांच्या भिक्खूंचा आहे ज्यांचे 2017 साली निधन झाले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हा खरंच 201 वर्षांच्या समाधिस्थ बौद्ध भिक्खूंचा फोटो आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False