मनोरी गावात कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

Coronavirus False

मनोरी गावातील एका कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले, अशा दाव्यासह एक व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या नावाखाली अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

मनोरी गावातील या व्हिडियोबाबत इंटरनेटवर शोध घेतला असता लोकमतची बातमी आढळली. यामध्ये पोलिसांनी माहिती दिली आहे की, गोराईच्या मनोरी गावामध्ये एक कोरोना संक्रमित रुग्णाच्या घरच्यांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले असता नातेवाईक व स्थानिकांनी त्यांना विरोध करीत गोंधळ घातला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व त्यांची समजूत काढली. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह पसरविण्यात आला होता.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने मग गोराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव नारकर यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, सदरील व्हिडियोत कोणत्याही रुग्णाचा मृतदेह नाही. सदरील व्हिडियो चुकीच्या दाव्यासह शेयर करण्यात येत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या हद्दीमध्ये या व्हिडियोच्या वेळी कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता. कोरोना पॉजिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली होती. त्याचा हा व्हिडियो आहे. अवयव गायब केल्याची माहिती पूर्णतः खोटी आहे. 

त्यानंतर आम्ही मुंबई क्षेत्र-2 चे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीदेखील या कोरोना रुग्णाच्या अवयव चोरीची निव्वळ अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.

मनोरी गावाशी निगडित प्रशासनिक अधिकाऱ्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला माहिती दिली की, आतापर्यंत गावात केवळ 3 ते 4 जण कोरोना संक्रमित असून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नातेवाईकांनी क्वारंटाईन होण्यास गोंधळ घातल्याच्या व्हिडियोला चुकीच्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे. मनोरी गावात कोरोना रुग्णाच्या अवयव चोरीचा दावा खोटा आहे. 

Avatar

Title:मनोरी गावात कोरोना रुग्णाचे अवयव गायब करण्यात आले नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False