
जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकमध्ये तणावाचे वातावरण आहे. विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करून पाक शांततेचा पुढाकर करत असल्याचे दाखवत असला तरी पाकच्या कुरापती कमी होत नाही आहेत. पाकिस्तान भारतातील तब्बल 12 शहरांत बॉम्बहल्ला आणि तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी करत असल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

तथ्य पडताळणी
दैनिक पुढारीनेही पाकिस्तानची भारताच्या 12 शहरांवर बॉम्बहल्ल्या करण्याची योजना असल्याचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानमधील द न्यूज या दैनिकाच्या हवाल्याने हे वृत्त आपण देत असल्याचे पुढारीने या वृत्तात म्हटले आहे.

http://www.inm24.in या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या संकेतस्थळानेही यासाठी द न्यूज या पाकिस्तानी दैनिकाचा यासाठी हवाला दिला आहे.

या वृत्ताची सत्यता पडताळण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी 5 मार्च 2019 रोजीचे पाकिस्तानी हवाई दलाचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात कुठेही भारतातील 12 ठिकाणांवर हल्ला करण्याची पाकिस्तानची योजना असल्याचे म्हटलेले नाही. भारताने हल्ला केल्यास तिप्पट मोठा प्रतिसाद देऊ, अशी दर्पोक्ती मात्र पाकिस्तानने केली आहे.
Tough times not yet over: #PAF chief
— The News (@thenews_intl) 5 March 2019
Read more: https://t.co/r8O3HcvQih#TheNews https://t.co/hxoiw68oDO

पाकिस्तान लष्कराच्या आणि हवाई दलाच्या ट्विटर अकाऊंटवरही फॅक्ट क्रिसेंडोला अशा स्वरुपाचे कोणतेही ट्विट आढळून आले नाही.
निष्कर्ष
भारतातील 12 ठिकाणांवर हल्ला करण्याची पाकिस्तानची योजना असल्याचा दावा जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत अन्य दोन संकेतस्थळांनीही पाकिस्तानी वृत्तपत्राच्या आधारे हा दावा केल्याचे दिसून आले. पाकिस्तान वृत्तपत्र द न्यूजच्या संकेतस्थळावर गेले असता पाकिस्तानी हवाई दलाने असा कोणताही आकडा दिल्याचे दिसत नाही. भारताने हल्ला केल्यास तिप्पट मोठा प्रतिसाद देऊ, असे केवळ पाकिस्तानच्या हवाई दलाने म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या
तथ्य पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी : भारतातील 12 शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
