BANKING FACT: एक जूनपासून बँकांमध्ये कॅश व्यवहार सहा वाजेपर्यंत सुरू राहणार का?

False राजकीय | Political

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे की, देशातील सगळ्या बॅंकांमध्ये एक जूनपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रोकड व्यवहार सुरू राहणार आहेत. सध्या बँकांमध्ये ग्राहक 3.30 किंवा 4 वाजेपर्यंतच रोकड व्यवहार करू शकतात. परंतु, शनिवारपासून नवीन नियम लागू होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. अनेक लोक याला खरे मानत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुस्थपणावर गदा आणत एक जूनपासून देशातील सगळ्या बॅँकामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू राहणार आहेत.

तथ्य पडताळणी

गुगलवर यासंदर्भात शोध घेतला असता काही बातम्या समोर आल्या. लोकसत्ता दैनिकातील 30 मे रोजीच्या बातमीनुसार, ग्राहकांना आता आंतरबँक निधी हस्तांतरणाची सर्वात गतिमान सुविधा असलेले आरटीजीएसव्यवहार हे उशिरात उशिरा सायंकाळी 6 वाजेपर्यंत करणे शक्य होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने 1 जून 2019 पासून या व्यवहारांसाठी निर्दिष्ट वेळ ही सायंकाळी 4.30 ते 6.00वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

नवभारत टाईम्सनेदेखील ही बातमी दिली आहे. आरबीआयने आरटीजीसद्वारे पैसे पाठविण्याची वेळ दीड तासांनी वाढविली आहे. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) द्वारे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत तत्काळ रक्कम पाठविता येते. याद्वारे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते.

मूळ बातमी येते वाचा – नवभारत टाईम्स

आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात आदेश उपलब्ध आहे. 28 मे रोजीच्या पत्रकानुसार, आरटीजीएसद्वारे पैसे पाठविण्याची सुरवात सकाळी 8 वाजता होणार. ग्राहकांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही सुविधा वापरता येणार. आंतरबँकीय हस्तांतरणाची मर्यादा रात्री 7.45 वाजेपर्यंत आहे. रात्री आठ वाजता आरटीएस व्यवहार पूर्णतः बंद होतील. हे नवीन वेळापत्रक एक जूनपासून (शनिवार) लागू होणार आहे.

मूळ आदेश येथे वाचा – RBI RTGS Order

आरटीजीएसचे वेळापत्रक यापूर्वी 1 सप्टेंबर 2015 रोजी बदलण्यात आले होते. तेव्हा 4.30 वाजेची मर्यादा घालण्यात आली होती. नवीन आदेशानुसार, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत केलेल्या आरटीजीएस व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु, सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान दोन रुपये तर, दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 5 रुपये शुल्क भरावे लागेल.

बॅँकेतील अधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नवीन नियमानुसार केवळ आरटीजीएस व्यवहारांची वेळ वाढविण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की, सायंकाळी 6 वाजेपर्यंत ग्राहकांना रोकड व्यवहार करता येतील. कॅश देवाणघेवाणाची वेळमर्यादा बँकेत जशी आता आहे, ती तशीच कायम राहणार आहे. वाढ फक्त आरटीजीएस करण्यासाठी दिली आहे.

बँकेचे कार्यालयीन वेळ कशी ठरवतात?

आरबीआयने 1 जुलै 2015 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, बँकेचा कार्यालयीन वेळ ठरविण्याचा कोणातही कायदा नाही. ग्राहक आणि कामकाजाच्या सोयीनुसार प्रत्येक बँक आपापली वेळ निर्धारित करू शकते. मात्र, बँकेने सोमवार ते शुक्रवारदरम्यान किमान 4 तास कॅश व्यवहार आणि शनिवारी किमान दोन तास ग्राहकांना कॅश सेवा देणे अपेक्षित आहे. परिपत्रकाच्या पान क्र. 34 वर याविषयी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मूळ परिपत्रक येथे वाचा – Master Circular on Customer Service in Banks

निष्कर्ष

आरबीआयने काढलेल्या पत्रकानुसार, एक जूनपासून केवळ आरटीजीएसची वेळ सहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बँकेतील इतर कॅश व्यवहार मात्र सध्याच्या वेळेप्रमाणेच सुरू राहतील. त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. म्हणून सदरील पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:BANKING FACT: एक जूनपासून बँकांमध्ये कॅश व्यवहार सहा वाजेपर्यंत सुरू राहणार का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False