सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून मुकेश अंबानी यांनी पार्टीचे आयोजन केले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत तर रात्री संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या पार्टीचा एक व्हिडिओ शेयर होत आहे. दावा केला जात आहे की, यापार्टीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे. 

काय आहे दावा?

व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमिर खान, अक्षय कुमार यांसारखे विविध प्रसिद्ध सेलिब्रेटी मुकेश अंबानी यांच्या पार्टीमध्ये सामील झाल्याचे दिसते. यावेळी कोणीही मास्क घातलेला नाही किंवा सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळण्यात आलेले नाही. सोबत म्हटले की, “गर्भश्रीमंतांच्या कार्यक्रमात कोरोना येत नाही असेच दिसते, मुकेश अंबानी आजोबा झाल्यावर सर्व प्रकारचे नेते, अभिनेते कोरोना  विसरले, सामाजिक अंतर तर सोडून द्या, दिवसभर रेल्वेमध्ये उपदेशाचे डोस पाजणारा अमिताभ, रात्री गोरगरिबांसाठी संचारबंदी लावणारे मुख्यमंत्री सगळेच नागडे होऊन नाचायला लागले, उद्धवा अजब तुझे सरकार.

नातवाच्या जन्मानिमित्त त्यांनी ही पार्टी आयोजित केल्याचेही म्हटले जात आहे.

मूळ व्हिडिओ – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

गुगलवर की-वर्ड्सवर सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ तर 2019 मधील आहे. युट्यूबवर या पार्टीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. 

गेल्या वर्षी गणेश चतुर्थीनिमित्त मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे, आमिर खान, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, राज ठाकरे यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटींनी यावेळी हजेरी लावली होती.

चीनमध्ये गेल्या डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली होती. भारतात मार्च 2020 पासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. ही पार्टी 3 सप्टेंबर 2019 रोजीची आहे. म्हणजेच कोरोनाच्या आधीची आहे.

या पार्टीचे अनेक फोटो त्यावेळी विविध मीडिया वेबसाईट्सने प्रसिद्ध केले होते. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आपण या पार्टीला उपस्थित माधुरी दीक्षित, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी आणि आमिर खान यांचा फोटो पाहू शकता.

मूळ बातमी – मिड-डे 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरी आयोजित ही पार्टी कोरोना काळातील नाही. ती 2019 मधील गणेशोत्वादरम्यानची आहे. त्यामुळे या पार्टीत कोणीही मास्क घातलेले नाहीत. म्हणून या व्हिडिओवरून सोशल डिस्टन्सिंगचे नियम भंग करण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे. कोरोनाविषयक इतर फॅक्ट-चेक येथे वाचा.

Avatar

Title:सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून मुकेश अंबानी यांनी पार्टीचे आयोजन केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False