FACT CHECK: राजीव दीक्षित यांच्या नावे 5-जी नेटवर्कविरोधातील पोस्ट कितपत खरी आहे?

False वैद्यकीय सामाजिक

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येत्या 100 दिवसांत 5-जी सेवेची चाचणी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतात लवकरच 5-जी इंटरनेट वापरायला मिळणार. परंतु, दूरसंचार क्षेत्रातील ही उडी आपल्या आरोग्यासाठी घातक तर नाही ना ठरणार? सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर राजीव दीक्षित यांनी चेतावणी दिली होती की, 5-जी तंत्रज्ञान हे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. 5-जी नेटवर्कमुळे शरीरातील पेशी नष्ट होऊन वेगवेगळे आजार होऊ शकतात, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये राजीव दीक्षित यांचा फोटो देऊन लिहिले की, कोट्यवधी लोकांना मारण्याचा काही श्रीमंतांचा मोठा डाव आहे. लवकरच 5-जी नावाचे एक धोकादायक तंत्रज्ञान सगळीकडे पसरविण्यात येणार आहे. 5-जी तंत्रज्ञानामुळे मानवी शरीरातील पेशींचा ऱ्हास होतो. यामुळे शरीर खिळखिळे होऊन नवनवीन आजारांना आपण बळी पडू. सोबत पेशींवर होणारा परिणाम दर्शविणारे चित्र दिले आहे.

तथ्य पडताळणी

राजीव दीक्षित हे स्वदेशी अभियानासाठी कार्यरत होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा देशातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी आझादी बचाव आंदोलन सुरू केले होते. आपल्या भाषणातून ते याविषयी जनजागृती करायचे. त्यांचा वयाच्या 44 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2010 साली मृत्यू झाला होता. पोस्टमध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी केलेले कोणतेही वक्तव्य आढळले नाही.

पोस्टमध्ये 5-जी तंत्रज्ञानाचा पेशींवर कसा परिणाम होतो याचे चित्र दिले आहे. त्यावरून गुगलवर आम्ही Dark Field Microscopy After Exposure To Smart Meter असे सर्च केले. त्यातून यूट्यूबवरील एक व्हिडियो समोर आला. इन पॉवर मुव्हमेंट चॅनेलने हा व्हिडियो 21 ऑगस्ट 2013 साली अपलोड केला होता. या व्हिडियोचे नीट अध्ययन केल्यावर लक्षात येते की, हा व्हिडियो 5-जी तंत्रज्ञानाचा मानवी पेशींवर कसा परिणाम होतो याविषयी नाही.

Shocking “Smart” Meter Effects On Human Blood नावाच्या या व्हिडियोमध्ये स्मार्ट विद्यूत मीटरचे रक्तपेशींवर कसे दुष्पारिणाम होतात हे दाखविले आहे. स्मार्ट मीटरमधून पडणाऱ्या रेडियशनमुळे रक्तातील पेशींवर अनिष्ट आघात होतो असा या व्हिडियोमध्ये दावा केला आहे. ‘टेक बॅक युवर पॉवर’ नावाच्या एक माहितीपटातील ही क्लिप आहे. संपूर्ण माहितीपट तुम्ही येथे पाहू शकता.

स्मार्ट मीटरविरोधातील हे दावे खोटे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. ‘हाऊ टू गीक’ वेबसाईटवरील लेखानुसार, मोबाईल फोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या वायरलेस तंत्रज्ञानावरच स्मार्ट मीटर काम करते. त्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी असते आणि हे रेडिएशन मानवी आरोग्यासाठी हानिकारक नसते. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या विविध आजारांचे दावे निराधार आहेत.

मूळ लेख येथे वाचा – हाऊ टू गीकअर्काइव्ह

म्हणजे पोस्टमध्ये दिलेले चित्र 5-जी तंत्रज्ञानाचा मानवी पेशींवर होणाऱ्या परिणामांचे नाही. तसेच त्याचा राजीव दीक्षित यांच्याशीदेखील संबंध नाही.

मग 5-जी तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होतो का?

4-जी इंटनेटपेक्षा एक हजार पट अधिक वेगवान असणारे 5-जी तंत्रज्ञान आगामी काळात सर्वत्र उपलब्ध होणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये 5-जीचे जाळे पसरण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी अनेकांनी 5-जी तरंगामुळे होणारे दुष्परिणाम घातक असल्याचे म्हटले आहे. सुमारे 250 वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला पत्र पाठवून वायरलेस तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मोबाईल आणि इतर रेडियो फ्रिक्वेन्सी उत्सर्जित करणाऱ्या यंत्रांतून विद्युतचुंबकीय क्षेत्र रेडियो तरंग निर्माण होत असल्यामुळे कर्करोगाची धोका बळावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे संपूर्ण पत्र येथे वाचा.

जागतिक आरोग्य संघटनेने मोबाईल फोनमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 1996 साली इंटरनॅशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड्स प्रोजेक्टची सुरुवात केली होती. याअंतर्गत वैज्ञानिकांनी संशोधक करून निर्वाळा दिला की, गेल्या दोन दशकांच्या अध्ययनाअंती मोबाईल फोनमुळे आरोग्यावर कोणताही घातक परिणाम होत असल्याचे आढळून येत नाही. असे असले तरीही मोबाईल तरंगापासून कॅन्सरच्या शक्यतेविषयी अनिश्चितता कायम आहे.

मूळ रिपोर्ट येथे वाचा – जागतिक आरोग्य संघटना

निष्कर्ष

5-जी तंत्रज्ञानामुळे मानवी पेशी नष्ट होऊन विविध आजार होण्याविषयी राजीव दीक्षित यांच्या नावे खोटी पोस्ट पसरविली जात आहेत. पोस्टमध्ये दिलेले चित्रदेखील स्मार्ट विद्युत मीटरच्या दुष्परिणामांविषयीच्या माहितीपटातील आहे. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: राजीव दीक्षित यांच्या नावे 5-जी नेटवर्कविरोधातील पोस्ट कितपत खरी आहे?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False