ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचा खोटा मेसेज व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय

जगभरात धोका निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसविषयी सध्या अनेक सजम-गैरसमज प्रचलित होत आहेत. सोशल मीडियावर आता मेसेज फिरत आहे की, ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला असून, त्यामुळे चिकन खाऊ नये. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज खोटा (FAKE) असल्याचे निष्पण्ण झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

चीनमधील वुहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेल्या नव्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 450 पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले असून, हजारो लोकांना याची लागण झालेली आहे. भारतात आतापर्यंत तीन जणांमध्ये कोरोना व्हायरस आढळलेला आहे.

कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना व्हायरस आला का याची माहिती घेण्यासाठी पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातुन कळाले की, कोंबडीचा हा फोटो जुना आणि कोरोना व्हायरसशी संबंध नसलेला आहे.

Pasture One नावाच्या वेबसाईटवर कोंबड्यांमध्ये होणारे विविध आजार व त्यावरील उपायांची माहिती देणाऱ्या लेखात हा फोटो वापरण्यात आला आहे. Aspergillosis या बुरशीजन्य रोगाच्या संदर्भात हा फोटो देण्यात आलेला आहे. 

मूळ फोटो येथे पाहा – Pasture One

या संदर्भात माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने अकोला येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ डॉ. गोपाल मंजूळकर यांच्याशी संपर्क साधला. ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याची निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील कोंबड्या किंवा इतर पशुप्राण्यांमध्ये अद्याप कोरोना व्हायरस आढळल्याची माहिती समोर आलेली नाही. “Aspergillosis हा एक बुरशीजन्य रोग आहे. पशुखाद्य जास्त काळ ओले राहिल्यावर किंवा वातावरणात दमटपणा वाढल्यास खाद्यावर बुरशी लागते. असे खाद्य खाल्ल्यामुळे प्राण्यांना विषबाधा होते,” असे डॉ. मंजूळकर यांनी माहिती दिली.

फॅक्ट क्रेसेंडोने मग महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. दिपश्री देसाई यांच्याशी संपर्क केला. त्यांनीदेखील सोशल मीडियावर पसरणारा मेसेज फेक असल्याचे सांगितले.

“ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस आल्याचा कोणताही पुरावा अद्याप आढळलेला नाही. सोशल मीडियावर पसरणारा मेसेज चुकीचा आहे. कोरोना व्हायरसविषयीची अधिकृत माहिती सरकार आणि त्या विषयातील तज्ञच आपल्यासमोर आणतील. त्यामुळे नागरिकांनी व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये. चिकन किंवा अंडी खाण्यास काहीच हरकत नाही,” असे डॉ. देसाई म्हणाल्या.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. एस. रानडे यांनीदेखील ब्रॉयलर कोंबड्यांमधील कोरोना व्हायरसच्या अफवेला खोटे ठरविले आहे. ‘अ‍ॅग्रोवन’मधील बातमीमध्ये डॉ. रानडे म्हणतात की, ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून, शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नाही. व्हॉट्सअप, फेसबुक आदी माध्यमांवर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – अ‍ॅग्रोवन

भारतातील मांसाहाराची पद्धत सुरक्षित

भारतात चिकन व मटण उकळवून व शिजवून खाल्ले जात असल्यामुळे मांसाहाराची ही पद्धत सर्वाधिक सुरक्षित असल्याचे डॉ. रानडे यांचे मत आहे. विषाणू साधारणतः 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. डॉ. देसाई यांनी सांगितले की, आपण मांसाहारी पदार्थ शिजवताना त्यामध्ये वापरणारे मसाले जसे, आलं, लसूण,  हळद असे औषधी गुणधर्माचे मसाले वापरतो. त्यामुळेदेखील विषाणुंचा प्रादूर्भाव होण्याचा धोका कमी असतो.

निष्कर्ष

भारतात अद्याप कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरलेला नसून, तसा मेसेज खोटा आहे. ब्रॉयलर कोंडबड्यांमध्ये कोरोना व्हायरस झाल्याचा मेसेज खोटा असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. या मेसेज सोबत फिरत असलेले फोटो जुने व इतर रोगांची लागण झालेल्या कोंबड्यांचे आहेत. त्यामुळे अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचा खोटा मेसेज व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False