
कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानने शीख धर्मीयांचा ध्वज लावण्याऐवजी पाकिस्तानी ध्वज लावला आहे, अशी माहिती देत प्रसन्न नरेश खकरे यांनी काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पाकिस्तानने कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानचा ध्वज लावला आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही ही छायाचित्रे रिव्हर्स इमेजने शोधली. त्यावेळी आम्हाला इस्लाम टाईम्स या संकेतस्थळावर काही छायाचित्रे दिसली. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे पाकिस्तानकडून पुरविण्यात आलेल्या मार्गावरील सुविधांची आहेत.
अनेक ठिकाणी ही छायाचित्रे कर्तारपूर मार्गिकेची असल्याची म्हटल्याचे आम्हाला दिसून आले. जवळपास सर्वच पाकिस्तानी माध्यमांनी कर्तारपूर मार्गिकेची माहिती देताना ही छायाचित्रे वापरल्याचे दिसून येते. द एक्स्प्रेस ट्रिब्यून या पाकिस्तानी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त देताना या ठिकाणी इमिग्रेशन सेंटर असल्याचे म्हटले आहे. यांच्याशेजारीच दीडशे फूट उंचीचा पाकिस्तानी ध्वज असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
द एक्स्प्रेस ट्रिब्यून / Archive
या इमिग्रेशन सेंटरचा आपण युटयूबवर उपलब्ध असलेला एक व्हिडिओ देखील खाली पाहू शकता.
कर्तारपूर गुरुद्वारात शीख धर्मीयांचा ध्वज असल्याचे आपण खालील छायाचित्रात स्पष्टपणे पाहू शकता.
या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, व्हायरल होत असलेले छायाचित्र हे इमिग्रेशन सेंटरचे असून कर्तारपूर गुरुद्वाराचे नाही.
निष्कर्ष
कर्तारपूर गुरुद्वाराचे म्हणून या कॉरिडोअरमधील इमिग्रेशन सेंटरचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : कर्तारपूर येथील गुरुद्वारावर पाकिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
