READ FACTS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खरंच महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्याविरोधात पत्र लिहिले का?

False राजकीय

भारतीय राजकारणामध्ये महिलांचा टक्का वाढवण्याची गरज विविध राजकीय पक्षांनी बोलून दाखविली आहे. काही पक्षांनी तर यंदा लोकसभेला उमेदवारी देताना महिलांना विशेष प्राधान्य दिले. अशावेळी सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कथित पत्र व्हायरल होत असून यामध्ये महिलांच्या राजकारणात प्रवेश करण्यावर आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पत्राची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमधील कथित पत्र संघाचे सर सहकार्यवाह सुरेश सोनी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना 20 एप्रिल रोजी लिहिलेले आहे. यामध्ये भाजपतर्फे महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने भाजपला नुकसान होणार असल्यामुळे त्यांची उमेदवारी काढून घेण्याचाही सल्ला पत्रामध्ये दिला आहे. तसेच महिलांनी राजकारणात प्रवेश केल्यावर आई म्हणून भारताच्या पुढच्या पिढीला संस्कार कोण देईल, असा प्रश्नदेखील पत्रात उपस्थित केलेला आहे.

युजरने हे पत्र शेयर करताना लिहिले की, महिलांनो, तुम्हाला तुमचे स्वतंत्र टिकवायचे असेल तर संघ विरोधी व्हा…धार्मिक तालिबानी मानसिकता नेहमी स्त्री विरोधी असते सगळ्याच धर्मात…संघाचा खरा चेहरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा शेअर करून

मूळ पत्र खाली वाचा.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असे काही पत्र लिहिले का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची वेबसाईट, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट तपासले. तेव्हा संघाचे जम्मू काश्मीर प्रांताचे सह सेवाप्रमुख चंद्रकांत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पत्र ट्विटरवर आढळले. हे पत्र संघाच्या लेटरहेड (Letterhead) वरील आहे.

अर्काइव्ह

या पत्रातील लेटरहेडची फेसबुक पोस्टमधील कथित पत्रातील लेटरहेडशी तुलना केल्यावर अनेक विसंगती समोर येतात.

1. व्हायरल पत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावच चुकविले आहे. स्वयंसेवक हा शब्द एकत्र लिहिण्याऐवजी “स्वयं सेवक” असा वेगळा करून लिहिला आहे. लेटरहेडमध्ये एवढी मोठी चूक होणे अपेक्षित नाही.

2. संघाचे मुख्य कार्यालय नागपुरातील महाल भागातील आहे. तेथील पिन कोड 440032 आहे. व्हायरल पत्रामध्ये मात्र पिनकोड 440120 असा दिला आहे. नागपूरमध्ये हा पिन कोडच उपलब्ध नाही. नागपूर शहरातली सर्व पिन कोडच्या यादीची पीएडफ फाईल तुम्ही येथे पाहू शकता – नागपूर पिन कोड

3. संघाच्या अधिकृत लेटरहेडमध्ये तारखेसह नागपूर असा शहराचा उल्लेख आहे. व्हायरल पत्रामध्ये तो नाही.

4. संघाच्या अधिकृत लेटरहेडमध्ये तिथीदेखील जाते. व्हायरल पत्रामध्ये 20 एप्रिल 2019 रोजी वैशाख महिन्याची तिथी दिली आहे. परंतु, भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार 21 एप्रिल पासून वैशाख महिना सुरू झाला. त्यामुळे ही तिथी चुकली आहे.

5. व्हायरल पत्रामध्ये संघाच्या मुख्यालयाचा ई-मेल देखील दिलेला नाही.

वरील विसंगतीवरून हे लक्षात येते की, सोशल मीडियावर पसरविले जात असलेले पत्र संघाचे अधिकृत पत्र नाही. संघाच्या मूळ लेटरहेडची प्रतिकृती करण्याचा येथे अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.

मग सुरेश सोनी यांनी खरंच असे पत्र पाठविले होते का?

बीबीसी हिंदीला सुरेश सोनी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या नावाने असे बनावट पत्र सोशल मीडियावर पसरविले जात असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. हे पत्र खोटे आहे. संघाच्या श्रेष्ठींना आधीच याचा खुलासा केलेला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – बीबीसी हिंदीअर्काइव्ह

निष्कर्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या नावे सोशल मीडियावरील पसरविले जाणारे महिलांच्या राजकीय प्रवेशाविरोधातील पत्र बनावट आहे. संघाच्या मूळ लेटरहेडची प्रतिकृती करण्याचा अयशस्वी प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.

Avatar

Title:READ FACTS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खरंच महिलांना लोकसभेची उमेदवारी देण्याविरोधात पत्र लिहिले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False