
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरकुंभ येथील दोन केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. शेजारील गावे रिक्त करण्यात येत आहेत. 20 किलोमीटरपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटस टोलनाका बंद आहे. कृपया हा मेसेज लवकरात लवकर पोहचवा, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत अशी कोणती घटना घडली आहे का, याचा सर्वप्रथम आम्ही शोध घेतला. त्यावेळी अशी कोणतीही घटना नुकतीच घडल्याचे दिसून आले नाही मात्र दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने 15 ऑगस्ट 2019 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार 14 ऑगस्ट 2019 रोजी एका रासायनिक कंपनीला आग लागली होती. याचा फटका पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूकीला आणि आजूबाजूच्या गावांना बसला होता. ही आग नियंत्रणात आणण्यात दुसऱ्या दिवशी यश आले.
दैनिक सकाळच्या संकेतस्थळावरील वृत्त / Archive
इतर अनेक संकेतस्थळांनीही याबाबतचे वृत्त दिल्याचे दिसून येते. अशी घटना घडलीच नसेल तर मग या माहितीसोबतचा व्हिडिओ आला कुठून असा प्रश्न आम्हाला पडला. या व्हिडिओत नागरिक गुजराती बोलत असल्याचे आणि यात स्फोट होत असल्याचे आम्हाला दिसून आले. आम्ही या व्हिडिओतील एक छायाचित्र घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात आम्हाला एबीपी अस्मिता या वृत्तवाहिनीचे 9 जानेवारी 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार सुरत येथे गॅस नेणाऱ्या वाहनाची शाळेच्या बसशी धडक झाली. या घटनेत बसला आणि टॅकरला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्यानंतर आम्हाला गुजरात समाचार या वृत्तपत्राने 9 जानेवारी 2020 रोजी दिलेले या घटनेबाबतचे वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार ट्रकने बसला दिलेल्या धडकेनंतर सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेत ट्रक, शाळेची बस आणि रिक्षा जळून खाक झाले.
गुजरात समाचारच्या संकेतस्थळावरील वृत्त / Archive
गुजरात समाचारने या घटनेचा एक व्हिडिओ देखील दिला आहे. तो व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
हा व्हिडिओ सुरतमधील असल्याचे स्पष्ट झाल्यावर आम्ही दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. हा व्हिडिओ देखील येथील नाही. येथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. कोणीतरी ही अफवा पसरवली आहे.
निष्कर्ष
पुण्याजवळील कुरकुंभ येथे रायायनिक कंपनीत स्फोटाची अथवा आग लागल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेचा म्हणून पसरविण्यात येत असलेले व्हिडिओ सुरतमधील आहे. दौड पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:Fact : कुरकुंभ एमआयडीसीत भीषण स्फोटाची अफवा; तो व्हिडिओ सुरतचा
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
