‘फालतू सण बंद करा’; उद्धव ठाकरेंचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, वाचा सत्य

False राजकीय | Political

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सध्या एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. 30-सेकंदाची क्लिप शेयर करून दावा केला जात आहे की, हिंदु सणांविरोधात बोलताना ठाकरे यांनी ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, 2017 सालच्या व्हिडिओतून सोयीनुसार क्लिप एडिट करून ती चुकीच्या माहितीसह फिरवली जात आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल क्लिपमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे म्हणतात की, एक तर तुम्ही आता पंचाग फाडून टाका आणि लोकांना सांगा की, हे तुमचे जे काही फालतू सण-बिन आहे…ही थोतांड बंद झाली. तुम्ही आहात तसे जगताय तेच खूप झालं. हाच काय तो आदेश एकदाचा काढून टाका म्हणजे सणावारीचा विषयच संपून जाईल. मग फटाकेही नाही राहणार आणि सणही नाही राहणार. हे सगळं जे काही होत आहे…ही थेरं जी चाललेली आहेत…मला वाटतं एकदा याच्यावरती शांततेचा अतिरेक झाला तर असंतोषाचा जो स्फोट होईल, तो सगळ्या शांततेचा भंग केल्याशिवाय राहणार नाही.

मूळ व्हिडिओ – फेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

या व्हिडिओ क्लिपवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे ‘चक्क हिंदुंनाच इशारा’ देत असल्याचा प्रचार केला जात आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे पाहू. क्लिपमधील की-फ्रेम्स निवडून त्यातील यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले हा उद्धव ठाकरेंचा हा मीडिया बाईट 2017 मधील आहे. 11 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा बाईट दिला होता. 

मूळ व्हिडिओ झी-24 तास चॅनेलवरील आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्ट कळते की, सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना ठाकरे यांनी सदरील विधान केले होते. 

त्याचे झाले असे होते की, आदल्यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाची समस्या लक्षात घेता दिल्ली व आसपासच्या भागात फटाके विक्री करण्यावर बंदी घातली होती. या निर्णायाचे स्वागत करताना तत्कालिन पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. यावरून बराच वाद पेटला होता. 

दुसऱ्या दिवशी (11 ऑक्टोबर 2017) पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना याविषयी विचारले असता त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढत उपरोधक प्रतिक्रिया दिली की, “ [न्यायालयाने सांगून टाकावे की,] हे तुमचे जे काही फालतू सण-बिन आहे…ही थोतांड बंद झाली. तुम्ही आहात तसे जगताय तेच खूप झालं.

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ गहाळ आहे. ते न्यायालयाला उद्देशून बोलत होते. तसेच मूळ व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणतात की, “एक तर विविध कर आणि नियम-अटींमुळे सण आणि उत्सवाचे वातावरण कमी होत चालले आहे. त्यामुळे जर कोणी आपापल्या परीने सण साजरे करीत असेल तर त्याच्या कोणीही आड आलेले शिवसेना सहन करणार नाही.” हे वाक्य व्हायरल क्लिपमधून एडिट केलेले आहे.

मूळ बातमी – एबीपी माझाअर्काइव्ह

यावरून स्पष्ट होते की, सदरील क्लिपमध्ये उद्धव ठाकरे हिंदू सणांविरोधात बोलत नव्हते. ठाकरे यांच्या या विधानानंतर रामदास कदम यांनीसुद्धा घुमजाव करीत स्पष्ट केले होते, “हिंदूंच्या सणांवर निर्बंध येतील असं पाप आपण आणि शिवसेना करणार नाही.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा अर्धवट व्हिडिओ शेयर करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. व्हायरल क्लिपमध्ये ठाकरे यांनी हिंदू सणांविरोधात प्रतिक्रिया दिलेली नसून, न्यायालयाच्या फटाकेविक्रीबंदीविरोधात ते बोलत होते.

Avatar

Title:‘फालतू सण बंद करा’; उद्धव ठाकरेंचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False