FACT CHECK : काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा अमेरिकन नागरिक आहेत का?

False राजकीय

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राजीव व राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा सध्या वादग्रस्त विधानांमुळे बरेच चर्चेत आहेत. त्यांनी शीख दंगलींबाबत (1984) केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि पर्यायाने काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठविली. सोशल मीडियावर त्यांच्या नागरिकत्वावर शंका घेण्यात येत आहे. सॅम पित्रोदा भारतीय नसून अमेरिकेचे नागरिक असल्याचा दावा केला जाता आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

कोण आहेत सॅम पित्रोदा

सॅम पित्रोदा हे टेलिकॉम इंजिनियर म्हणून जगप्रसिद्ध आहेत. राजीव गांधी यांच्यासह मिळून त्यांनी भारतात दूरसंचार क्रांती आणण्यात मोठे योगदान दिले. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या पित्रोदांचे नाव सत्यम आहे. ओडिशामध्ये बालपण आणि गुजरातमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर पित्रोदा 1964 साली अमेरिकेत स्थलातंरित झाले. तेथे त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या नावे अनेक पेटेंट आहेत. ऐंशीच्या दशकात त्यांची इंदिरा गांधी यांच्याशी भेट झाली. भारतात टेलिफोनचे जाळे पसरविण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. पुढे इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी सॅम पित्रोदा यांना 1987 साली टेलिकॉम कमिशनचे (आजचे डिजिटल कम्यूनिकेशन कमिशन) संस्थापक चेयरमन नियुक्त केले. पुढे ते नॅशनल नॉलेज कमिशनचेदेखील अध्यक्ष होते. पंतप्रधान राजीव गांधीचे विश्वासातील सल्लागार होते. याविषयी अधिक येथे वाचा.

तथ्य पडताळणी

सॅम पित्रोदा 1964 साली अमेरिकेत गेल्यानंतर काही वर्षांनी त्यांना तेथील नागरिकत्व मिळाले. शिकागो ट्रिब्यूनवरील बातमीनुसार, राजीव गांधी पित्रोदांना त्यांच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करू इच्छित होते. त्यांच्यावर दूरसंचार खात्याची जबाबदारी देण्याची त्यांनी ठरविले होते. त्यासाठी पित्रोदा यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडावे लागणार होते. पण, भारतात काम करण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग केला आणि भारतीय नागरिक झाले. अमेरिकेचे नागरिकत्व सोडणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मूळ बातमी येथे वाचा – शिकोगो ट्रीब्यूनअर्काइव्ह

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतल्यावर इकोनॉमिक टाईम्समध्ये सॅम पित्रोदा यांनी लिहिलेल्या लेखातदेखील अमेरिकेचे नागरिकत्व सोडण्याची बाब त्यांनी नमूद केली आहे. ते लिहितात, “मी अमेरिकेचा नागरिक असल्याचा 1989 साली संसदेमध्ये आरोप करण्यात आला होता. तो आरोप साफ खोटा होता. मी भारतात अमेरिकन म्हणून आलो खरा; परंतु, राजीव गांधी यांच्यासोबत काम सुरू केल्यावर 1987 साली अमेरिकेचे नागरिकत्व सोडून अधिकृतरीत्या भारताचा नागरिक झालो.

मूळ लेख येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्सअर्काइव्ह

मिंट या दैनिकाने 2009 साली पित्रोदांची मुलाखत घेतली होती. यामध्येदेखील त्यांनी याबद्दल सांगितले आहे. मी अमेरिकन नागरिक म्हणून भारतीय पंतप्रधानासोबत काम करून शकत नव्हतो. तसा निर्णय घेणे गरजेचे आहे. हा निर्णय मी कोणाच्या सांगण्यावरून घेतला नव्हता. नैतिकदृष्ट्या मला तो गरजेचा वाटत होता म्हणून मी तो घेतला.

मूळ मुलाखत येथे वाचा – मिंटअर्काइव्ह

बालाकोट हवाई हल्ल्याचे पुरावे मागितल्यामुळे पित्रोदावर प्रचंड टीका झाली होती. त्यावेळीदेखील ते अमेरिकन असल्याचे म्हटले गेले. त्याला उत्तर देताना पित्रोदा यांनी ट्विट केले होते की, माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, भारतात दूरसंचार क्रांती आणण्यासाठी मी अमेरिकेचे नागरिकत्व त्याग केले होते. भारताशी असणाऱ्या माझ्या बांधिलकीवर शंका घेऊ नका.

अर्काइव्ह

भारत सरकारने स्थापन केलेल्या टेलिकॉम कमिशनचे पहिले चेयरमन सॅम पित्रोदा होते. या कमिशनची 11 एप्रिल 1989 रोजी अधिसूचना काढण्यात आली होती. अधिसूचनेत केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचा सचिव टेलिकॉम कमिशनचा पदसिद्ध चेयरमन असेल, अशी तरतुद करण्यात आली होती.

मूळ अधिसूचना येथे वाचा – टेलिकॉम कमिशन, 1989

सेंट्रल स्टाफिंग स्कीमतर्फे केंद्रीय विभाग/खात्याचे सचिव निवडले जातात. राज्याचे मुख्यसचिव या पदाच्या समान हे पद असते. त्यामुळ सॅम पित्रोदा अमेरिकन असते तर, त्यांनी टेलिकॉम कमिशनच्या चेयरमनपदी निवड होणे शक्यच नाही. सचिवांची निवड कशी केली जाते याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे वाचा – सेंट्रल स्टाफिंग स्कीम

निष्कर्ष

सॅम पित्रोदा भारताचे नागरिक नसून, अमेरिकेचे नागरिक असल्याचा दावा असत्य आहे. पित्रोदा यांचा जन्म भारतात झाला होता. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेव्हा त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले. पण 1987 साली ते पुन्हा भारतीय नागरिक बनले.

Avatar

Title:FACT CHECK : काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा अमेरिकन नागरिक आहेत का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False