ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर होती. आम आदमी पार्टीचे गुजरात राज्यप्रमुख गोपाल इटालिया यांनीसुद्धा सुरत येथून अर्ज दाखल केला. नामांकन भरण्याआधी त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती. 

विशाल गर्दीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इटालिया यांच्या नामांकन रॅलीमध्ये इतक्या प्रचंड संख्येने लोक सहभागी झाले होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली.

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. सहा वर्षांपूर्वीचा हा फोटो पश्चिम बंगालमधील आहे. 

काय आहे दावा ? 

गर्दीचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “गोपाल इटालियांनी आज सुरतमध्ये राघव चढ्ढासोबत विराट रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला. या फोटोमध्ये गुजरातच्या जनतेचे कल कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट दिसते.” 

मुळपोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी 

व्हायरल फोटोला गुगल इमेज द्वारे सर्च केले असता कळाले की, 2017 पासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हाच फोटो 21 जुलै 2017 साली शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी लिहिले होते की, ऐतिहासिक ‘शहीद दिना’च्या दिवशी आयोजित रॅलीला मिळालेला भरघोस प्रतिसाद. 

पश्चिम बंगालमध्ये 1993 साली तृणमूल काँग्रेसच्या 13 कार्यत्यांच्या राजकीय हत्या करण्यात होती. त्यांच्या स्मरणार्थ 21 जुलै हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

मूळ पोस्ट – फेसबुक 

हाच फोटो ‘द हिंदू’ वर्तमानपत्रानेसुद्धा 2017 साली प्रकाशित केला होता. ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त कोलकाता शहरातमध्ये सभा घेतली होती. 

वरील फोटोमध्ये कोलकात्यामधील टीपू सुलतान मस्जिद स्पष्ट दिसते. 

गोपाल इटालीया यांची सुरतमधील नामांकन रॅली   

गोपाल इटालिया सुरत शहरातील उपनगर कतारगाम भागातून ‘आप’तर्फे विधानसभा निवडणूक लढवित आहेत. 

त्यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काढलेल्या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला विराट गर्दीचा फोटो ममता बॅनर्जी यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या सभेचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो गुजरातच्या नावाने शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False