ढगांच्याही वर असणारे हे गाव कोणते? आणि तेथे खरंच कधी पाऊस पडत नाही का? वाच सत्य

False आंतरराष्ट्रीय

जगात अशा कित्येक जागा आहे ज्या परिकथांपेक्षा कमी नाहीत. स्वप्नातील वाटावे अशाच एका गावाचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. असे गाव जे ढगांपेक्षाही जास्त उंचीवर आहे. तेथून ढग खाली जमा झालेले दिसतात. जणू काही स्वर्गच. सोबत असेही म्हटले जातेय की, या गावात कधीच पाऊस पडत नाही. असे हे जगातील एकमेव ठिकाण आहे. हा व्हिडियो नेमका कुठला आहे आणि तेथे खरंच कधी पाऊस पडत नाही का अशी विचारणा फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (9049043487) केली आहे

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे तपासले. इंग्रजीमध्ये Above Cloud Village असे सर्च केल्यावर काही फोटो आणि लेख समोर आले. त्यामध्ये काही लाओसमधील अखा, इंडोनेशियामधील मंतार, इराणमधील फिलबंद अशी अनेक गावे ढगांच्यावर असल्याचे कळाले. परंतु, सदरील व्हिडियो यापैकी एकाही गावातील नाही.

विविध की-वर्ड्स टाकून अधिक सर्च केल्यावर एक ट्विट मिळाले. हिशाम अल-ओमेसी नामक व्यक्तीने 19 सप्टेंबर रोजी हा व्हिडियो ट्विट केला होता. त्यानुसार, हा व्हिडियो येमेन देशातील हुतैब नावाच्या गावाचा आहे.

येमेनची राजधानी सनापासून पश्चिमेला मनकाह जिल्ह्यातील हराज पर्वतरांगेत हुतैब हे गाव वसलेलं आहे. प्रचीन इतिहासाचा वारसा लाभलेल्या या गावाला येमेनमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून 3200 फुट उंच असलेल्या या गावात जगभरातून पर्यटक येतात. अकराव्या शतकात हे गाव वसविण्यात आले होते. इतक्या उंचीवर असूनही येथील तापमान अत्यंत अल्हादायक आहे. हिवाळ्यातसुद्धा केवळ सकाळी कडाक्याची थंडी पडते. सुर्य उगवल्यावर मात्र पुन्हा सुसह्य तापमान होते. येथील कॉफी खूप प्रसिद्ध आहे.

या गावाचे भारताशी फार जुने संबंध आहे. बोहरी समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. मुंबईत राहणारे प्रसिद्ध बोहरी प्रचारक मोहम्मद बुऱ्हानुद्दीन येथे दर तीन वर्षांनी भेट द्यायचे. त्यांचे 2014 साली निधन झाले.

मग या गावात कधीच पाऊस पडत नाही का?

मिळालेल्या माहितीमध्ये कुठेही या गावात पाऊस पडत नाही, असे म्हटल्याचे आढळले नाही. जर या गावात खरंच पाऊस पडत नसता तर ती नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली असती आणि त्याविषयी लिहिले गेले असते. पण तसे काहीच आढळून आले नाही.

मग पृथ्वीवर पाऊस न पडणारी कोणकोणती ठिकाणे आहेत याचा शोध घेतला. लाईव्हसायन्स या प्रतिष्ठित वेबसाईटवर त्याची एक यादी मिळाली. त्यामध्ये येमेनमधील हुतैब गावाचे नाव नाही. या यादीनुसार, अंटार्क्टिका खंडावरील ड्राय व्हॅलीमध्ये कधीच पाऊस पडत नाही. मंगळ ग्रहासारखी परिस्थिती येथे असल्याचे मानले जाते.

त्यानंतर चिली या देशातील अरिका येथेसुद्धा दरवर्षी 0.761 मिमी एवढाच पाऊस पडतो. हा न पडण्याच्या बरोबरच आहे. यासोबतच लिबियातील अल-कुफराह (0.860 मिमी), इजिप्तमधील असवान (0.861 मिमी), लुक्झोर (0.862 मिमी) अशी काही ठिकाणे आहेत जेथे काहीच पाऊस पडत नाही.

निष्कर्ष

ढगांच्यावरील गाव म्हणून जो व्हिडियो व्हायरल होत आहे तो मूळात येमेन देशातील हुतैब गावाचा आहे. समुद्रसपाटीपासून 3200 फुट उंचीवर हे गाव वसलेले आहे. परंतु, येथे कधीच पाऊस नाही पडत नाही हा दावा तथ्यांवर आधारित नाही.

Avatar

Title:ढगांच्याही वर असणारे हे गाव कोणते? आणि तेथे खरंच कधी पाऊस पडत नाही का? वाच सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False