FAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही

False राजकीय

इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार, अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, असा ‘लोकसत्ता’ वेबसाईटच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटला खरे मानून अनेकजण शेअर करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा स्क्रीनशॉट बनावट आहे. ‘लोकसत्ता’ने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक 

सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला आहे.

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टमध्ये केवळ स्क्रीनशॉट दिलेला आहे. मूळ बातमीची लिंक कुठेही दिलेली नाही.

त्यामुळे सर्वप्रथम आम्ही ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर ही बातमी शोधली. विविध कीवर्ड्स वापरूनही अशी कोणतीही बातमी आढळली नाही.  या शीर्षकाची एकही बातमी लोकसत्ताच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपलब्ध नाही.

मग नितीन गडकरींनी असे विधान केले का याचा शोध घेतला. त्यांनी जर खरंच असे विधान किंवा घोषणा केली असती तर सर्व माध्यमांनी याची बातमी केली असती. परंतु, तसेही काही आढळले नाही. शिवाय त्यांच्या ट्विटर खात्यावरही अशी घोषणा केल्याची माहिती उपलब्ध नाही.

पुढे खातरजमा करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडो मराठीने ‘लोकसत्ता’ वेबसाईटचे संपादक योगेश मेहेंदळे यांच्याशी संपर्क केला. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट बनावट असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणीतरी खोडसाळपणे असा स्क्रीनशॉट तयार केलेला असून, ‘लोकसत्ता’ने अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ‘लोकसत्ता’ने ट्विटरद्वारे खुलासादेखील केला. 

“अशी बातमी लोकसत्तानं केली नसून ही इमेज खोडसाळपणे समाजमाध्यमांत प्रसारित करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

मूळ ट्विट – लोकसत्ता

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, बनावट स्क्रीनशॉटद्वारे ‘लोकसत्ता’ आणि नितीन गडकरी यांच्या नावे फेक न्यूज पसरविली जात आहे.  देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार, असे ना गडकरी म्हणाले, ना तशी ‘लोकसत्ता’ने बातमी दिली. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False