READ FACTS: राहुल गांधी यांचे लग्न झाले नाही आणि विकिलीक्सने तसा खुलासाही केला नाही

False राजकीय

विकिलीक्सने राहुल गांधी यांच्या गोपनीय वैवाहिक जीवनाचा हा खळबळजनक खुलासा केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. गांधी कुटुंबाचे वारसदार आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे लग्न झालेले असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये राहुल गांधी यांचा एका विदेशी तरुणीसोबतचा फोटो दिलेला आहेत. सोबत लिहिले की, राऊल विंची (राहुल गांधी) विवाहित असल्याचा विकिलीक्सने खुलासा केला आहे. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलाचे नियाक (14) तर, मुलीचे नाव माईनक (10) आहे. ते लंडनमध्ये राहतात. त्यांची पत्नी कोलंबिया देशाची नागरिक आहे. अविवाहित सांगून राहुल गांधी देशाची फसवणूक आहेत.

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांच्या लग्नाची माहिती शोधताना आम्हाला सामना दैनिकातील ही राहुल गांधींची होणारी बायको आहे का ? ट्विटरवर चर्चा अशा मथळ्याखालील बातमी आढळली. 22 सप्टेंबर 2017 रोजीच्या या बातमीत म्हटले की, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्यासोबत एका सुंदर तरुणीचा फोटो ट्विटरवर त्याच तरुणीने शेअर केला आहे. नतालिया रामोस असं या तरुणीचं नाव आहे.

मूळ बातमी येथे वाचा – सामनाअर्काइव्ह

बातमीत नतालिया रामोसने राहुल गांधी यांच्यासोबतचा ट्विटरवर वर शेयर केलेला फोटोदेखील दिला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. नतालियाने तो 14 सप्टेंबर 2017 रोजी शेयर करताना लिहिले की, उत्तम वाक्पटू आणि ज्ञान असलेल्या राहुल गांधी यांच्यासोबत काल रात्री भेट झाली.

अर्काइव्ह

नतालिया ही अभिनेत्री असून 3 जुलै 1992 रोजी तिचा स्पेनमध्ये जन्म झाला होता. मात्र, ती अमेरिकेची नागरिक आहे. म्हणजे ती पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे कोलंबिया देशाची नागरिक नाही. तिचे वय केवळ 27 वर्षे आहे.

सामनाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. याविषयी मग आम्ही शोध घेतला. राहुल गांधी 11 सप्टेंबर 2017 रोजी अमेरिकेला गेले होते. तेथे त्यांनी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचे विचार या लोकांसमोर मांडले होते.

याविषयी अधिक येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

राहुल गांधी आणि नतालियाची भेट बरग्रुएन इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमात झाली होती. या संस्थेच्या ट्विटर अकाउंवटरून या कार्यक्रमातील फोटो शेयर केलेला आहे. नतालियासोबतच्या फोटोत राहुल गांधी यांनी परिधान केलेल निळे ब्लेझर आणि खाली दिलेल्या फोटोतील राहुल गांधीचा पेहराव सारखाच आहे. नतालियाने फेसबुकवर राहुल गांधीला भेटण्याची संधी दिल्याबद्दल बरग्रुएन इन्स्टिट्यूटचे आभार मानले आहेत.

वरील माहितीवरून हे तर स्पष्ट झाले की, फेसबुक पोस्टमधील फोटो राहुल गांधी यांच्या पत्नीचा नसून तो अभिनेत्री नतालिया रामोसचा आहे.

मग विकिलीक्सने राहुल गांधींच्या लग्नाचा खुलासा केला का?

विकिलीक्स ही जगभरातील गोपनीय माहिती, छायाचित्रे, व्हिडियोज प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त विना-नफा वेबसाईट आहे. 2006 साली ती स्वीडनमध्ये सुरू झाली होती. विकिलीक्सने राहुल गांधीबद्दल उघड केलेल्या दस्ताऐवजामध्ये त्यांच्या लग्नाचा कोणाताही खुलासा नाही. दस्तऐवजामध्ये त्यांच्याबद्दलचा सर्वाधिक चर्चिला गेलेली REACHING OUT TO RAHUL GANDHI AND OTHER YOUNG PARLIAMENTARIANS ही फाईल आढळली.

अमेरिकेच्या राजदुताशी 2009 साली चर्चा करताना राहुल गांधी म्हणाले होते की, भारतासमोर मुस्लिम समर्थक दहशतवादापेक्षा उजव्यासरणीच्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनाचा धोका मोठा आहे. डिसेंबर 2010 मध्ये उघड करण्यात आलेल्या या फाईलमुळे त्याकाळी बराच वाद झाला होता.

मूळ फाईल येथे वाचा – विकिलीक्सअर्काइव्ह

निष्कर्ष

फेसबुक पोस्टमध्ये दिलेला फोटोतील तरुणी राहुल गांधी यांची पत्नी नसून, स्पॅनिश-अमेरिकन अभिनेत्री नतालिया रामोस आहे. 2017 साली अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींशी भेट झाल्यावर तिने तो शेयर केला होता. तसेच विकिलीक्सने राहुल गांधी यांच्य लग्नाबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:READ FACTS: राहुल गांधी यांचे लग्न झाले नाही आणि विकिलीक्सने तसा खुलासाही केला नाही

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False