
रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगभरातील देश रशियावर आर्थिक निर्बंध घालून आक्रमण थांबविण्याचे आवाहन करीत आहेत. यामध्ये भारताची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशातच अमेरिकेतील लोकप्रिय न्यूज चॅनेल सीएनएनच्या एका कथित बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे, की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले, की हा स्क्रीनशॉट बनावट आहे. पुतीन यांनी भारताला असा कोणताही इशारा दिलेला नाही.
काय आहे दावा?
सीएनएन न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये पुतीन यांच्या फोटोसह म्हटले आहे, की पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धामध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे; अन्यथा भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम पाहुया, की हा स्क्रीनशॉट खरा आहे का. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर सीएनएन वेबसाईटवर मूळ बातमी आढळली. मूळ व्हिडिओ बातमीमध्ये सीएनएनचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी फ्रेड्रिक प्लाईटजेन रिपोर्टिंग करीत आहेत.
2020 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याबाबत रशियाच्या एका नेत्याने काय विनोद केला, याबाबतची ही बातमी आहे.
बातमीच्या शीर्षकात म्हटले आहे, की “अमेरिकेच्या निवडणूकीमध्ये हस्तक्षेप रशियासाठी आता एक विनोदाची गोष्ट बनली आहे.”

मूळ बातमी – सीएनएन
सीएनएनच्या बातमीत कुठेही पुतीन यांनी भारताला इशारा दिल्याचा उल्लेख नाही.
मूळ बातमी आणि व्हायरल स्क्रीनशॉट या दोन्हींमध्ये असणाऱ्या टेक्स्टमध्येसुद्धा फरक आहे.
खाली दिलेल्या तुलनात्मक फोटोत हा फरक लगेच दिसतो.

पुतीन काय म्हणाले मग?
24 फेब्रुवारी रोजी पुतीन यांनी युक्रेनवर विशेष सैन्य कारवाई करत असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी इतर देशांना रशिया-युक्रेन युद्धामध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला होता.
पुतीन म्हणाले होते, की “दोन देशांमधील वादामध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या देशांना मी काही सांगू इच्छितो. तुमच्यापैकी कोणीही आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा त्वेषाने प्रतिकार करू – एवढेच नाही तर कधीही अनुभवले नसेल तसे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
यामध्ये त्यांनी कुठेही भारताचे नाव किंवा भारताला उद्देशून काहीही वक्तव्य केले नव्हते. संपूर्ण भाषण तुम्ही येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते, की सीएनएन वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट बनावट आहे. पुतीन यांनी भारताला कोणताही इशारा दिलेला नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धामध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला का?
Fact Check By: Agastya DeokarResult: Altered
