
डब्यावर ‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडी व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेचे नाव बदलून मालगाडीवर ‘अदानी’ असे लिहिण्यात आले आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
भारतीय रेल्वेचे खासगीकरण करून मालगाड्या चालविण्यात येत असल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर अदानी समुहाकडून चालविण्यात कंटेनर वाहतूकीच्या मालगाड्याचे अनेक व्हिडिओ दिसून आले. युटूयूबवर 7 एप्रिल 2013 रोजी अपलोड करण्यात एक व्हिडिओ खाली देण्यात आला आहे.
याखेरीज युटूयूबवर अन्य व्हिडिओ देखील प्राप्त झाले. जे आपण खाली पाहू शकता.
त्यानंतर आणखी शोध घेतल्यावर दिसून आले की, अदानी लॉजिस्टिक या बहुराष्ट्रीय कंपनीने 2006 पासून कंटेनर वाहतूकीचा अखिल भारतीय परवाना घेतलेला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेने जानेवारी 2007 मध्ये अदानी लॉजिस्टिकसह खासगी ऑपरेटरसाठी कंटेनर गाड्यांचा व्यापार खुला केलेला केला.
लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2007 पासून अदानी लॉजिस्टिक भारतात कंटेनर गाड्या चालवित आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास यावर GPWIC (General-Purpose Wagon Investment Scheme) असे लिहिल्याचे दिसून येते.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, 2018 मध्ये भारतीय रेल्वेने अदानी ग्रुप आणि टाटा स्टीलसह सहा कंपन्यांना GPWIC अंतर्गत परवानगी दिली. केंद्र सरकारची भारतातील 109 व्यस्त मार्गावर 151 खासगी गाड्या चालवण्याची योजना आहे. भारतात धावणाऱ्या एकुण रेल्वे गाड्यांपैकी हे प्रमाण केवळ पाच टक्के आहे.
भारतीय रेल्वेचे नाव बदलणार असल्याचे कोणतेही वृत्त आढळून आले नाही. यातून हे स्पष्ट झाले की, अदानी लॉजिस्टिक एक दशकाहून अधिक काळापासून अन्य 14 खासगी कंपन्यांसह ही कंटेनर सेवा पुरवत आहे.
निष्कर्ष
भारतीय रेल्वेचे नाव बदलण्यात आल्याचा आणि त्या अदानी समूहाला विकण्यात आल्याचा दावा असत्य आहे. अदानी समूहासह अन्य 14 कंपन्यांना कंटेनर सेवा पुरविण्यास 2006 पासून परवानगी देण्यात आलेली आहे.

Title:‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडीच्या व्हिडिओचे सत्य काय?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
