
गेल्या आठवड्यात युपीएससीचा निकाल लागला. त्यात मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा गावातील सुमित विश्वकर्मा या गवंडी काम करणाऱ्या युवकाने देशात 53 वा क्रमांक मिळवला, अशी लोकमतने बातमी दिली. दिवसभर काम आणि रात्री 8-10 तास अभ्यास करून त्याने हे देदिप्यमान यश कमावले, असे बातमीत म्हटले आहे. “गरिबीचे चटके सोसत आणि परिस्थितीशी दोन हात करून यशाचे एव्हरेस्ट पार करणाऱ्या” सुमितचे सोशल मीडियावर सध्या खूप कौतुक होत आहे; पण खरंच गवंडी काम करून सुमित कलेक्टर झाला का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
मूळ बातमी येथे वाचा – लोकमत । अर्काइव्ह
लोकमतने दिलेली ही बातमी त्यांच्या फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आली आहे. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट सुमारे आठ हजार वेळा लाईक आणि दीड हजार वेळा शेयर करण्यात आली आहे. शेकडो लोकांनी या बातमीचे आणि सुमितचे कौतुक केले आहे.

(डिलीट केलेला आर्टिकल येथे वाचा – अर्काइव्ह)
तथ्य पडताळणी
लोकमतच्या बातमीत म्हटले की, मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील घंसौर तालुक्यातील सुमित विश्वकर्माने युपीएसएसी परीक्षेत 53 वा रँक मिळवला. त्याचे वडील गवंडीकाम करतात. त्याने स्वतःदेखील बांधकामावर मजुरी केली आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याला सुरवातीला यश मिळाले नाही. नंतर त्याने मग यूपीएसएसी परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, सुमितने ज्या कॉलेजमधून इंजिनियरिंग केली तेथेच बांधकाम मजुरीदेखील केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा (Civil Service Exam) शनिवारी (7 एप्रिल) निकाल जाहीर झाला होता. फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम हा निकाल तपासला. तेव्हा एक आश्चर्याची गोष्ट समोर आली. निकालामध्ये 53 व्या क्रमांकावर सुमित कुमार असे नाव होते. बातमीत तर सुमित विश्वकर्मा असे नाव दिले आहे.
मूळ निकाल येथे पाहा – UPSC RESULT
मग याविषयी आम्ही अधिक शोध घेतला असता एबीपी न्यूज चॅनेलने सुमीत विश्वकर्माविषयी बातमी केली होती. परंतु, ती बातमी आणि व्हिडियो डिलीट करण्यात आला आहे.
मग हा सुमीत कुमार कोण आहे?
ट्विटरवर सुमित कुमार नावाच्या एका व्यक्तीने “सुमित विश्वकर्मा”चा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोबत त्याने त्याचा यूपीएसएसीचा अॅप्लिकेशन फॉर्मदेखील दिला आहे. त्यानुसार “खरा” सुमित कुमार हा बिहारमधील जमुई जिल्हातील सिकंद्रा येथील आहे. तो इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस येथे ऑफिसर ट्रेनी म्हणून काम करायचा.
ट्विटमधील रोल क्रमांक आणि यूपीएससीच्या अधिकृत निकालामधील रोल क्रमांक सारखाच आहे.
निष्कर्ष
लोकमतच्या बातमीतील सुमित विश्वकर्माचे नाव यूपीएससीच्या वेबसाईटवरील निकालामध्ये नाही. तेथे 53 व्या रँकवर सुमित कुमार असे नाव आहे. त्यामुळे सुमित विश्वकर्मा कलेक्टर होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून लोकमतने दिलेली बातमी असत्य ठरते.

Title:FACT CHECK : आठ वर्षांपासून गवंडी काम करणारा सुमित खरंच “कलेक्टर” झाला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
