
बिईंग ह्युमन फाउंडेशनच्या माध्यमातून अभिनेता सलमान खान सामाजिक कार्य करीत असतो. त्याच्या सामाजिक मदतीच्या बातम्या अनेक वेळा छापून आलेल्या आहेत. त्याच्या अशाच सामाजिक वृत्तीची प्रचिती म्हणून सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट फिरत आहे की, त्याने मध्यप्रदेशमध्ये शुटींग थांबवून एका गरीब कॅन्सर पीडित मुलीची भेट घेतली आणि तिच्या उपचाराचा सगळा खर्चदेखील केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
पोस्टमध्ये सलमान एका दवाखान्यात रुग्णांशी भेटतानाच्या चार फोटोंचा कोलाज दिला आहे. सोबत लिहिले की, काल महेश्वर येथे शुटींग करत असताना सलमान खानला माहिती मिळाली की, जवळच्या दवाखान्यात एका कॅन्सर पीडित चिमुकलीवर पैशांअभावी योग्य उपचार होत नाहीए. त्याने तात्काळ शुटींग थांबवून दवाखान्यात त्या मुलीची भेट घेतली आणि सर्व उपचार खर्चाची जबाबदारी स्वीकारली. याला म्हणतात खरा हीरो.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोंना यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर फिल्मी बीट या सिनेबातम्यांच्या वेबसाईटवरील एक बातमी समोर आली. कॅन्सर पीडित बालचाहत्याला भेटून सलमान खानच्या डोळ्यातून पाणी आले, असे या बातमीचे शीर्षक आहे. 6 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमी खाली दिलेला फोटो आहे. फेसबुक पोस्टमधील फोटो आणि या बातमीतील हे फोटो सारखेच आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – फिल्मी बीट । अर्काइव्ह
बातमीत Salman Khan Fan Forever नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरील 5 नोव्हेंबर 2018 रोजीच्या व्हिडियोचा दाखला देत म्हटले की, गोविंद नामक व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या कॅन्सर पीडित पुतण्याला भेटण्याची सलमानला विनंती केली होती. सलमाने त्याच्या विनंतीला मान देत मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये जाऊन त्या मुलासह इतर कॅन्सर पीडित मुलांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
व्हिडियोमध्ये सलमान कॅन्सर पीडित बाल चाहत्याची आपुलकीने विचारपुस करताना दिसतो. सलमानच्या या भेटीच्या बातम्या अनेक दैनिक आणि वृत्तस्थळांनी केल्या आहेत. इंडिया टाईम्सच्या बातमीत म्हटले की, सलमानने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या बाल चाहत्याची भेट घेतली. यामध्ये सलमानने उपचाराचा खर्च उचलल्याचा उल्लेख नाही.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टाईम्स
मग महेश्वरचा काय संबंध आहे?
सलमान खानच्या ‘दबंग 3’ या आगामी चित्रपटाची शुटींग एक एप्रिल रोजी महेश्वर येथे सुरू झाली होती. मध्यप्रदेशमधील महेश्वर हे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील शहर आहे. 11 एप्रिल रोजी ती पूर्ण झाली. स्वतः सलमान खानने ट्विट करून ही माहिती दिली होती.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान येते शुटींग करीत असताना त्याला भेटायला एक कॅन्सर पीडित बालचाहता आला होता. हे कळाल्यावर सलमान खान त्याची शुटींग सोडूनन त्याच्यापाशी आला. त्याच्याशी काही वेळ बोलला, त्याच्यासोबत फोटो काढला, मुलाने सोबत आणलेल्या वहीवर सलमानने ऑटोग्राफ दिला. बातमीमध्ये सलमानने या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर । अर्काइव्ह
या प्रसंगाचा व्हिडियो पिंकविला या वेबसाईटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्ही पाहू शकता.
निष्कर्ष
फेसबुक पोस्टमध्ये दिलेले फोटो नोव्हेंबर 2018 मधील असून, सलमानने त्यावेळी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये भेट दिली होती. सलमान खान 1 ते 11 एप्रिलदरम्यान मध्यप्रदेशातील महेश्वर शहरात शुटींग करीत होता. त्यामुळे सलमान खानने शुटींग थांबवून मध्यप्रदेशमध्ये कॅन्सर पीडित चिमुकलीची भेट घेत उपचाराचा सर्व खर्च केल्याची पोस्ट असत्य आहे.

Title:सलमान खानने मध्यप्रदेशमध्ये कॅन्सर पीडित चिमुकलीची भेट घेऊन उपचाराचा खर्च उचलला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
