
फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगाचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना गेल्या महिन्यात घडली. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले. अनेक इस्लामिक राष्ट्रप्रमुखांनी मॅक्रॉन यांच्यावर तीव्र टीका केली.
या पार्श्वभूमीवर आता ‘कुराण’वर भर संसदेत टीका करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील अथवा या वर्षीचासुद्धा नाही. तो 2015 साली बेल्जियमच्या संसदेतील व्हिडिओ आहे.
काय आहे दावा?
हातात ‘कुराण’ घेऊन भर संसदेत टीका करणाऱ्या एका व्यक्तीची सुमारे एक मिनिटांची क्लिप व्हायरल होत आहे. त्यावरून अनेकांनी दावा केला की, फ्रान्समधील शिक्षकाच्या शिरेच्छेदानंतर तेथील संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटले गेले.
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते पाहू. त्यातील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ बेल्जियमधील संसदेतील आहे.
बेल्जियमधील अति-उजव्या विचारसरणीचे विरोधी पक्षनेते Filip Dewinter हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 22 जून 2015 रोजी त्यांनी बेल्जियम संसदेत ‘कुराण’ हातात घेऊन अशी वादग्रस्त टीका केली होती.
Embed from Getty Imagesकॅप्शन – Source: Getty Images
एका डच वृत्तस्थळाने दिलेल्या माहितीनुसार फिलीप यांनी कुराणवर टीका करताना बेल्जियममधील मशिदींमध्ये कट्टरवादाचे शिक्षण दिले जाते असा आरोप केला होता.
तत्कालिन सुरक्षामंत्री Jan Jambon यांनी फिलीप यांच्या विधानाचा निषेध करीत प्रत्युत्तर दिले होते की, आपल्या देशातील एका मोठ्या वर्गातील लोकांसाठी पवित्र असणाऱ्या ग्रंथावर तुम्ही अर्वाच्यपणे टीका केली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. धर्मातील कट्टरवादी तत्त्वाच्या विरोधात आपण सर्वच आहोत. परंतु, म्हणून सगळ्या धर्माला असे सरसकट बदनाम करण्यास आमचा विरोध आहे.
खुद्द फिलीप यांनीसुद्धा ट्विटरवर त्यांच्या भाषणाचा फोटो शेयर केला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, पाच वर्षांपूर्वीचा बेल्जियम संसदेतील व्हिडिओ फ्रान्सचा म्हणून शेयर करण्यात येत आहे. फ्रान्समध्ये शिक्षकाच्या शिरच्छेदाच्या घटनेनंतर तेथील संसदेत ‘कुराण’वर टीका करण्यात आलेली नाही. तो व्हिडिओ 2015 बेल्जियम संसदेतील आहे.

Title:फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटले गेले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
