बिहार निवडणुकीच्या ड्युटीवरील 9 BSF जवानांच्या अपघाती मृत्यूची अफवा; वाचा सत्य

False सामाजिक

बिहार निवडणुकीच्या ड्युटीवर जात असताना सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) जवानांची बस पलटून 9 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत पलटी झालेल्या बसचा फोटोसुद्धा शेयर होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. बस पलटून झालेल्या अपघातात एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही. 

काय आहे दावा?

पलटी झालेल्या बसचा फोटो टाकून लिहिले की, “बिहार राज्यात चालू असलेल्या इलेक्शनच्या बंदोबस्तासाठी जाणारी BSF जवानांची बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्याकडेला पलटी झाली. या अपघातात 9 जवान शहीद झाले तर बाकी जवान गंभीर जखमी झाले.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकअर्काइव्हअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पलटी झालेल्या बसच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो 4 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये दरभंगा-मुजफ्फरपुर जिल्ह्याच्या सीमाभागात झालेल्या अपघाताचा आहे. 

पंजाब केसरी वृत्तपत्रातील बातमीनुसार, बिहार निवडणुकीच्या ड्युटीवर असणाऱ्या बीएसएफ जवानांची बस बुधकारा गावाजवळील रस्त्यावर पलटली होती. यामध्ये 9 जवानांसह 10 लोक जखमी झाले होते.

मूळ बातमी – पंजाब केसरीअर्काइव्ह

अधिक माहिती घेतली असता दैनिक भास्करीच बातमी आढळली. जखमी जवानांना सिंहवाडा येथील एका प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले होते.  कंपनी कमांडर विजय बहादुर यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी जवानांची नावे हेड कॉन्स्टेबल संजय भाई, हेड कॉन्स्टेबल डी डी मेहंतो, कॉन्स्टेबल अविनाश कुमार, बसचालक बजरंगी सिंह, जवान रामचंद्र, विश्वजीत समर, समीर कुमार, एसके राय, विजय पासी आणि धनंजय कुमार अशी आहेत. 

जखमी जवानांवर उपचार केलेल्या डॉ. प्रेमचंद प्रसाद यांनी सांगितले की, सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.

मूळ बातमी – दैनिक भास्करअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बिहारमध्ये झालेल्या बस अपघातामध्ये बीएसएफच्या 9 जवानांचा मृत्यू झाल्याची बातमी असत्य आहे. या अपघातामध्ये 9 जवान जखमी झाले होते.

Avatar

Title:बिहार निवडणुकीच्या ड्युटीवरील 9 BSF जवानांच्या अपघाती मृत्यूची अफवा; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False