ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे नील आर्मस्ट्रॉग म्हणाले होते का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेमुळे सध्या सर्वत्र चंद्राविषयी चर्चा आहे. यात भर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या नावे सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. चंद्रावर चालून मला काही मिळाले नाही; पण ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे वक्तव्य आर्मस्ट्राँग यांनी केल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट व व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवरील पोस्टमध्ये 35 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर करण्यात येत आहे. यामधील व्यक्ती चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. तो म्हणतो की, I walked all over the world. I walked on the other world, without the knowledge of God. It was an exciting adventure and I would do it again. But it was not enough. The walk on the moon lasted three days, but the walk with Jesus lasts forever. Most of you here will never be a cosmonaut. It takes much training, you have to be dedicated. Those are good qualities to have. So, few of us will ever walk on the moon. But even the little children here can walk with God. The walk on the moon did not change my life, the walk with Jesus has changed my life. (मी जगभर भ्रमंती केली आहे, अगदी परग्रहावरसुद्धा (चंद्र) गेलो. तो एक अविस्मरणीय अनुभव होता. पुन्हा संधी मिळाल्यास मी पुन्हा तेथे जाईल. पण माझ्यासाठी ते एवढं महत्त्वाचं नाही. चंद्रावर मी केवळ तीन दिवस चललो; पण येशू ख्रिस्तासोबत तर मी आयुष्यभर चालू शकतो. येथे उपस्थितांपैकी सगळ्यांनाच चंद्रावर जाण्याची संधी मिळणार नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि तयारी लागते. पण अगदी लहान मुलंसुद्धा येशूबरोबर चालू शकतात. चंद्रावर चालून माझे जीवन बदलले नाही, ईश्वराबरोबर चालूनच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.)

तथ्य पडताळणी

नील आर्मस्ट्राँग खरंच असे काही म्हटल्याचे काही पुरावे, व्हिडियो, लेख, बातमी इंटरनेटवर आढळली नाही. मग गुगलवर विविध कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर युट्युबवर फेसबुक पोस्टमधील व्हिडियो मिळाला. Billy Graham Evangelistic Association नावाच्या युट्युब चॅनेलवर तो 18 जुलै 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडियोचे शीर्षक – Astronaut Charlie Duke: ‘Jesus Changed My Life’ असे आहे.

व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीनुसार, हे अपोलो-16 मिशनमध्ये चंद्रावर जाणारे अंतराळवीर चार्ली ड्युक आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध धर्मप्रसारक (एव्हान्जेलिस्ट) बिली ग्राहम यांच्या Billy Graham’s Crusade उपक्रमांतर्गत चार्ली ड्युक 1992 साली रशियामध्ये गेले होते. तेथे केलेल्या भाषणाची ही क्लिप आहे. याचाच अर्थ की, हा व्हिडियो नील आर्मस्ट्राँग यांचा नाही.

बिली ग्राहम यांच्या वेबसाईटवर चार्ली ड्युक यांनी त्यांचा जीवनप्रवास आणि ख्रिश्चन धर्मामुळे जीवनात आलेल्या शांतीचा अनुभव शेयर केला आहे. यामध्येसुद्धा त्यांनी 1992 साली मॉस्को क्रुसेडमध्ये भाग घेतल्याचा उल्लेख आहे.

मूळ लेख येथ वाचा – Billy Graham Evangelistic Associationअर्काइव्ह

कोण आहेत चार्ली ड्युक?

चार्ली ड्युक हे अमेरिकन अंतराळवीर आहेत. अपोलो-16 मिशनअंतर्गत ते चंद्रावर गेले होते. त्यापूर्वी त्यांच्याकडे पहिली यशस्वी चांद्रमोहीम अपोलो-11 मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रीन यांच्याशी संपर्क साधण्याची (CAPCOM) जबाबदारी होती. 1972 साली ते अपोलो-16 मिशनमध्ये लूनार मोड्युल पायलट म्हणून ते चंद्रावर गेले होते. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते दहावे आणि सर्वात तरुण व्यक्ती ठरले. 1975 साली ड्युक नासामधून निवृत्त झाले. चंद्रावर फिरण्याचा त्यांचा व्हिडियो खाली पाहू शकता.

कौटुंबिक वादामुळे मध्यंतरी त्यांना नैराश्य आले होते. याच काळात ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले व उतारवयात ख्रिश्चन धर्माची महती व वैयक्तिक अनुभवकथनाद्वारे लोकांना माहिती करून देऊ लागले. याच कार्यानिमित्त ते 1992 साली मॉस्कोमध्ये गेले होते. तेथे त्यांनी म्हटले होते की, चंद्रावर चालण्यापेक्षा मला येशूबरोबर चालणे जास्त महत्त्वाचे वाटते.

निष्कर्ष

सदरील व्हिडियोतील व्यक्ती नील आर्मस्ट्राँग नसून अंतराळवीर चार्ली ड्युक आहेत. Billy Graham’s Crusade उपक्रमांतर्गत चार्ली ड्युक यांनी 1992 साली रशियामध्ये केलेल्या भाषणाची ही क्लिप आहे. त्यामुळे सदरील पोस्ट चूक आहे.

Avatar

Title:ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे नील आर्मस्ट्रॉग म्हणाले होते का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •