फ्रान्सने ISI प्रमुखाच्या बहिणीसह 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

फ्रान्समध्ये गेल्या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त चित्रावरून एका शिक्षकाचा शिरेच्छेद करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फ्रान्समध्ये कट्टरवाद आणि मुस्लिम स्थलांतरितांचा मुद्दा तापला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवाद आणि कट्टरतावाद्यांविरोधात लढा देणार असल्याचे वक्तव्य केले होते.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, फ्रान्सने नुकतेच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या प्रमुखांच्या बहिणीसह 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. 

काय आहे दावा?

केसरी (अर्काइव्ह), वेबदुनिया (अर्काइव्ह) आणि आजतक सोलापूर (अर्काइव्ह) यासह अनेक मीडिया वेबसाईट्सने बातमी प्रसिद्ध केली की, फ्रान्समध्ये अवैधरीत्या राहणार्‍या 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा यांच्या बहिणीचाही समावेश आहे. या 183 पैकी 118 नागरिकांना तर फ्रान्सने परत पाकिस्तानातसुद्धा पाठवले आहे. पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

बातमीमध्ये म्हटले की, पाकिस्तानच्या दूतावासाने ट्विट करून अशी माहिती दिली आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, पाकिस्तानी दूतावासाच्या नावाने बनावट अकाउंटवरून तसे ट्विट करण्यात आले होते.

‘कॉन्सुलेट जनरल ऑफ पाकिस्तान फ्रान्स’ नावाच्या एका अकाउंटवरून 31 ऑक्टोबर रोजी ट्विट करण्यात आले होते की, “इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर टीका केल्यानंतर फ्रान्स सरकारने 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. 118 नागरिकांकडे वैध कागदपत्रे असूनही त्यांना जबरदस्तीने परत पाठविण्यात आले. आम्ही फ्रेंच सरकारकडे नागरिकांना तात्पुरते राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.” वेगळ्या ट्विटमध्ये आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा यांच्या बहिणीचा उल्लेख आहे.

मूळ ट्विट – ट्विटर | अर्काइव्ह

या ट्विटर अकाउंटची तपासणी केल्यावर कळते की, ते याच वर्षी एप्रिल महिन्यात तयार करण्यात आलेले आहे. तसेच या अकाउंटला केवळ 467 फॉलोवर्स आहे. एवढंच नाही तर हे अकाउंट इतर कोणत्याही पाकिस्तानी सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला फॉलोसुद्धा करीत नाही. 

यामुळे या अकाउंटच्या अधिकृततेविषयी शंका निर्माण होते.

मूळ अकाउंट – ट्विटर

याविषयी अधिक शोध घेतल्यावर कळाले की, हे तर बनावट अकाउंट आहे. पाकिस्तानच्या फ्रान्समधील राजदूतावास कार्यलयाचे अधिकृत अकाउंटचे नाव Embassy of Pakistan, Paris, France असे असून ट्वटिटर हँडल @PakinFrance असे आहे. हे अकाउंट 2011 साली तयार करण्यात आले होते. 

विशेष म्हणजे, फ्रान्समधील पाकिस्तान राजदूतावासाने 183 नागरिकांचा व्हिसा मागे घेतल्याची बातमी असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे. बनावट अकाउंटवरून तसे ट्विट करण्यात आले होते. 

1 नोव्हेंबरच्या ट्विटमध्ये त्या बनावट अकाउंटचा स्क्रीनशॉट देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तान एम्बसीचे केवळ एकच अधिकृत अकाउंट (@PakInFrance) आहे. आमच्या नावाचा वापर करणारे इतर अकाउंट फेक आहेत. अशा बनावट अकांउट्सला तुम्ही रिपोर्ट करू शकता.

अर्काइव्ह

पाकिस्तानी दूतावासाचे माध्यम सल्लागार दानयाल गिलानी यांनीसुद्धा सांगितले की, @PakInFrance केवळ हेच पाकिस्तानच्या पॅरिसमधील एम्बसीचे अधिकृत अकाउंट आहे. या अकाउंटला व्हेरिफाय (ब्लू टिक) करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानी दूतावासाच्या नावाने बनावट अकाउंट उघडून कोणीतरी खोडसाळपणा केला. त्यामुळे फ्रान्स सरकारने 183 पाकिस्तानी नागरिकांचा नागरिकांचा फ्रेंच व्हिसा रद्द केल्याची बातमी खोटी आहे.

Avatar

Title:फ्रान्सने ISI प्रमुखाच्या बहिणीसह 183 पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False