हा इटली विमानतळावरील कोरोना रुग्णांचा व्हिडियो नाही. हा सेनेगल येथील जून व्हिडियो आहे

Coronavirus False आंतरराष्ट्रीय

कोरोना विषाणूच्या भीतीपोटी अनेक खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या विमानतळावरील आपत्कालिन परिस्थितीचा एका व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर होत आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी आजारी प्रवाशांवर उपचार करताना दिसत असून, इतर लोक भीतीपोटी पळत आहेत. सोबत दावा केला की, हा व्हिडियो इटली विमानतळावरील कोरोना रुग्णांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सदरील 30 सेकंदाचा व्हिडियो शेयर करून सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन करीत लिहिले की, अजूनही वेळ गेलेली नाही शासनाने घातलेल्या निर्बंधांना सहकारी भावनेने पहा… सहकार्य करा नाहीतर ही वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते : इटलीचे विमानतळ

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकअर्काइव्ह

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणावर शेयर केला जात आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसते की, विमानावर “SENEGAL” लिहिलेले आहे. तसचे शेवटच्या सेंकदाला एका बॅनरवर “THIOKAM 2019” असे लिहिलेले आहे. त्याचबरोबर व्हिडियोतील लोकांच्या हालचाली आणि काही बंदुकधारी लोकांना पाहून असे वाटतेय की, विमानतळावर हल्ला झाला आहे. 

हे सर्व लक्षात घेता गुगलवर की-वर्डद्वारे शोधले असता Press Afrik वेबसाईटवरील 26 नोव्हेंबर रोजीची बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, सेनेगलची राजधानी डेकार शहारातील ब्लेज डिएग्ने विमानतळावर 28 नोव्हेंबर 2019 रोजी “THIOKAM” उपक्रमाअंतर्गत मॉकड्रील आयोजित करण्यात आली आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये कशा प्रकारे सामना करायचा याचे प्रात्याक्षिक या मॉक ड्रीलमध्ये करण्यात येणार असल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – Press Afrik

हा धागा पकडून युट्यूबवर शोधले असता Dakaractu TV नावाच्या युट्यूब चॅनेलवर 29 नोव्हेंबर 2019 रोजी अपलोड केलेला व्हिडियो आढळला. हा व्हिडियो आणि फेसबुकवर इटलीचा म्हणून पसरविण्यात येणारा व्हिडियो एकच आहे. दोन्ही व्हिडियोमध्ये Dakaractu TV चा लोगो आहे. या व्हिडियोमध्ये सेनेगलच्या राजधानीतील विमानतळाचे अधिकारी आणि तेथील उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी मॉक ड्रीलबद्दल माहिती देत आहेत. 

या मॉक ड्रीलच्या बातम्या येथे वाचू शकता – B7InfoThiès Info

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडियो इटलीमधील नाही आणि त्याचा कोरोना व्हायरसशी काही संबंध नाही. हा व्हिडियो सेनेगल या देशातील असून, नोव्हेंबर 2019 महिन्यात तेथील विमानतळावरील मॉक ड्रीलचा हा व्हिडियो आहे. विमान अपहरण परिस्थितीमध्ये कसे मदतकार्य करायचे त्याचे विमानतळावर प्रत्याक्षिक करण्यात आले होते.

Avatar

Title:हा इटली विमानतळावरील कोरोना रुग्णांचा व्हिडियो नाही. हा सेनेगल येथील जून व्हिडियो आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False