हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ओवेसी आणि स्मृती इराणी भेटले का? वाचा सत्य

False सामाजिक

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमित शहा, योगी आदित्यनाथ यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी हैदराबादेत प्रचारसभा घेतल्या. आज हैदराबादमध्ये मतदानही पार पडले.

या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांचा एकत्र फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, त्यांच्यामध्ये तीन तास बैठक झाली. या फोटोंवरून तर्कवितर्क लढविले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानंतर कळाले की, हा फोटो आताचा नसून, 2016 मधील आहे.

काय आहे दावा

ओवेसी आणि स्मृती इराणी यांचा फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये दावा केला आहे की, दोघांमध्ये तीन तास बैठक झाली. तसेच संशयसुद्धा व्यक्त केला की, बैठकीत धार्मिक तेढ व लव जिहादचा कट रचण्यात आला.

मूळ पोस्ट – फेसबुक | अर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो तर 2016 मधील आहे. माजी काँग्रेस नेते सुलभ पांडे यांनी 23 ऑगस्ट 2016 रोजी हा फोटो शेयर करून ओवेसे व भाजप यांच्यामध्ये संगनमत असल्याचा आरोप केला होता.

पांडे यांनी ट्विट केले होते की, ‘ओवेसी एकीकडे भाजपवर टीका करतात आणि दुसरेकडे त्याच पक्षातील नेत्यांसोबत फिरतात.’

पांडे यांच्या या ट्विटला उत्तर देताना ओवेसे म्हणाले होते की, हा फोटो यंत्रमागधारकांच्या बैठकीतील आहे. 

अर्काइव्ह 

असदुद्दीन ओवेसींनीच स्वतःदेखील 22 ऑगस्ट रोजी 2016 रोजी या बैठकीतील फोटो शेयर केले होते. यंत्रमाग उद्योगातील भागधारकांची ही बैठक होती. या फोटोंमध्ये ओवेसी आणि स्मृती इराणी दोघेही दिसतात. फोटोंसोबत ओवेसी म्हणाले होते, ‘सुमारे दोन कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या 50 लाख यंत्रमागांची अवस्था सध्या अत्यंत बीकट अवस्था आहे.’

अर्काइव्ह 

द टाईम्स ऑफ इंडियाने या बैठकीची बातमी प्रसिद्ध केली होती. दिल्लीत 22 ऑगस्ट 2016 रोजी तत्कालिन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ओवेसी आणि इराणी यांचा चार वर्षे जूना फोटो हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

Avatar

Title:हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ओवेसी आणि स्मृती इराणी भेटले का? वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False