अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

False सामाजिक

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला. 

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही.

काय आहे व्हिडियोमध्ये?

अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचा उल्लेख करून म्हणतात की, कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपडणारे हे पांढऱ्या कोटातील देवच आहेत. नानावती रुग्णालयातील तज्ज्ञांचा मला अनेकदा लाभ मिळालेला आहे. तुम्ही धैर्य न खचू देता असेच जोमाने काम करीत राहा.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

हाच व्हिडियो लोकमत, महाराष्ट्र टुडे, माजी उर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील शेयर केला. बावनकुळे यांनी ट्विट करीत म्हटले की, या जागतिक महामारीच्या संकटकाळी आपल्या जीवाची पर्वा न करता,अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या देवदूतांचे प्रतिरूप असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्यकर्मचाऱ्यांचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आभार मानले आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे त्यांनी विशेषतः आभारी असल्याचे सांगितले.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अमिताभ बच्चन यांनी 11 जून रोजी ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या राय आणि नात अराध्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे नंतर समोर आले. पैकी अमिताभ आणि अभिषेक यांना नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर, ऐश्वर्या व अराध्याला घरातच क्वारंटाईन करण्यात आले.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांचे आभार मानतानाचा हा व्हिडियो शेयर करण्यास सुरुवात केली. अनेकांना वाटले की, कोरोना झाल्यानंतर अमिताभ यांनी थेट नानावटी हॉस्पिटलमधून हा व्हिडियो तयार केला. परंतु, तथ्य काही वेगळेच आहे.

इंटरनेटवर की-वर्ड्सद्वारे सर्च केल्यावर लक्षात आले की, हा अमिताभ यांचा हा व्हिडियो एप्रिल महिन्यापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. नेशन नेक्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडियो 27 एप्रिल 2020 रोजी अपलोड करण्यात आला होता.

त्याआधी 23 एप्रिल रोजी याच व्हिडियोविषयी दिव्य भास्कर या गुजराती वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच अमिताभ बच्चन यांच्या एका फॅन क्लब पेजनेदेखील फेसबुकवर 23 एप्रिल रोजी हा व्हिडियो शेयर केला होता. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो जुना आहे.

सदरील व्हिडियो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नानावती रुग्णालयाने प्रसिद्धपत्रक जारी करून सांगितले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडियो तयार केला होता.

मूळ स्टेटमेंट येथे वाचा – रिपब्लिक 

निष्कर्ष

अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानल्याचा तो व्हायरल व्हिडियो नाही. तो व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे.

Avatar

Title:अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False