चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू आहे का? वाचा ईदविषयक ‘त्या’ धड्यामागचे सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

महाआघाडीच्या सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. मराठीच्या पुस्तकातील ईदविषयक धड्याखालील प्रश्नांवर आक्षेप घेत दावा केला जात आहे की, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यानंतर हा असा धडा मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की सोशल मीडियावर केला जाणरा दावा भ्रामक आहे. हा धडा ना मुस्लिम उदात्तीकरण करणारा आहे, ना महाआघाडी सरकारच्या काळातील.

चौथीच्या पुस्तकातील पानाचा फोटो शेअर करून म्हटले आहे, की “महाआघाडी सरकारचा उद्धव ठाकरे शरद पवारचा भीमपराक्रम…मराठी शाळा अभ्यासक्रमात मुस्लिमांचे उद्दातिकरण चालू आहे, वेळीच ठेचला नाही तर आपील ढासळलेली शिक्षण व्यस्था नामशेष होईल. प्रश्न क्रमांक 2 वाचा – ईद ची प्रार्थना कशी चालते याचे वर्णन करा. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले की काय होते पाहिलं का?”

फेसबुकअर्काइव्ह

याच धड्यावरून आक्षेप घेणाऱ्या एका पालकाचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. पुस्तकातून हिंदू धर्माचे शिक्षण देण्याऐवजी शाळकरी मुलांवर मुस्लिम धर्माचे संस्कार बिंबवले जात आहेत, असा आरोप पालकाने केला आहे.

व्हिडिओसोबत म्हटले, की “सावधान आणखी किती जास्त काम करावे लागणार आहे हे ?! सध्याच्या राज्यसरकारने चवथीच्या पुस्तकात इस्लामीकरण कसे चालू आहे… !? ही व्यक्ती खेड्यातील आहे पण धर्म अभिमानी व जागरूक असल्याने त्यांच्या लक्षात आले…आपणही जागरूक व्हावे.”

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाहुया, की हा धडा नेमका काय आहे. बालभारतीच्या वेबसाईटवर चौथीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे पुस्तक चाळले. त्यात पान क्र. 27 वर ‘ईदगाह’ नावाचा धडा आहे. 

प्रख्यात हिंदी लेखक मुंशी प्रेमचंद लिखित कथेचा हा मराठी अनुवाद आहे. हमीद नावाच्या एका अनाथ मुलाची ईदच्या सणाच्या दिवशीची ही गोष्ट आहे. ईदच्या दिवशी स्वतःसाठी खेळणी विकत घेण्याऐवजी हमीद आजीसाठी चिमटा विकत घेतो. एवढ्या कमीत वयात सुद्धा स्वतःचा आनंद सोडून एक मुलगा कसा इतरांचा विचार करतो, असे या कथेतून सांगण्यात आलेले आहे.

संपूर्ण धडा तुम्ही खाली वाचू शकता. (मूळ हिंदी कथा येथे वाचा)

4th-Standard-Marathi-Balbharti-pages-37-40

(Caption – सौजन्यः बालभारती)

धडा वाचल्यावर कळेल, की यामध्ये कुठेही इस्लाम धर्माचे गौरवीकरण अथवा आक्षेपार्ह मजकूर नाही. उलट प्रेमचंद यांच्या सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक म्हणून ‘ईदगाह’ला मानले जाते. अशी उच्चदर्जाची साहित्यकृती चौथीच्या पुस्तकात मुलांच्या अभ्यासासाठी आहे. 

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या धड्याखाली विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे सण कोणते, ते कसे साजरे केले जातात याविषयीसुद्धा प्रश्न विचारलेला आहे. 

मग हा धडा कधीपासून अभ्यासक्रमात आहे?

सध्या शिकविला जाणारा अभ्यासक्रम 2013-14 या शालेय वर्षापासून टप्प्याटप्प्याने पाठ्यपुस्तक मंडळ प्रकाशित करत आहे, असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहे. मराठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे तत्कालिन संचालक चं. रा. बोरकर यांनी स्वाक्षरांकित केलेली ही प्रस्तावना 31 मार्च 2014 रोजीची आहे.

म्हणजेच तेव्हापासून हा धडा चौथीच्या पुस्तकात आहे. महाविकास आघाडीप्रणीत सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात स्थापित झाले. अर्थातच, त्या आधी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातही (2014-2019) हा धडा पाठ्यपुस्तकात होता. म्हणून महाविकास आघाडीसरकारच्या काळात हा धडा समाविष्ट करण्यात आला, हा दावा असत्य ठरतो.

‘बालभारती’चा खुलासा

चौथीच्या पुस्तकातील धड्याविषयी आक्षेप व्हायरल होऊ लागल्यावर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे पत्र काढून खुलासा करण्यात आला आहे. 

“’ईदगाह’ पाठाच्या संदर्भात विविध समाज माध्यमांतून चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इयत्ता चौथेचे हे मराठी बालभारतीचे पाठ्यपुस्तक गेल्या सात वर्षांपासून अभ्यासले जात आहे. सदर पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यास येऊ नये,” असे आवाहन विद्यमान संचालक कृष्णकुमार पाटील यांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने केला आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की चौथीच्या पुस्तकातून इस्लामीकरण किंवा मुस्लिमांचे उदात्तीकरण केले गेलेले नाही. या धड्याचा चुकीचा अर्थ लावून भ्रामक दावे पसरविले जात आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चौथीच्या पुस्तकातून मुस्लिमांचे उदात्तीकरण सुरू आहे का? वाचा ईदविषयक ‘त्या’ धड्यामागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Misleading