बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचेच सुपरमार्केट सुरू केले का? वाचा या फोटोमागील सत्य

False सामाजिक

नव्या कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका अद्यावत भाजी मार्केटचे फोटो शेअर होत आहेत. अगदी टापटीपपणे विक्रीसाठी ठेवलेल्या शेतमालाच्या फोटोंसोबत दावा केला जात आहे की, बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असे सुपरमार्केट सुरू केले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हे फोटो शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सुपरमार्केटचे नाहीत.

काय आहे दावा?

पोस्टमध्ये एका मोठ्या शेडमधील भाजी मार्केटचे विविध फोटो शेअर केलेले आहेत. सोबत म्हटले की, “शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे सुपरमार्केट. बेंगलोर कर्नाटकात शेतकऱ्यांनी सुरू केले स्वतःचे फळ, भाजींचे स्वतःचे सुपर मार्केट शेतातील माल डायरेक्ट ग्राहका कडे आता असेच केले पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच पुढे आले पाहिजे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये शेवटी या सुपरमार्केटच्या बोर्डचा एक फोटो आहे. त्यावर या सुपरमार्केटचे नाव HUMUS असे लिहिलेले आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, हे बंगळुरूमधील Humus Vegetable & Fruits Market आहे. HUMUS च्या फेसबुक पेजवर सदरील फोटो शेअर करण्यात आले होते.

Humus कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, हे एक शेतकी स्टार्ट-अप आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करून रास्त दरात ताजा भाजीपाला व फळे उपलब्ध करण्याचे काम या सुपरमार्केटद्वार केले जाते. स्वयंद्योजक, तंत्रज्ञ आणि शेती व उत्पादन क्षेत्रातील तज्ञांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. वेबसाईटवर कुठेही हे सुपरमार्केट शेतकऱ्यांनी सुरू केल्याचा उल्लेख नाही.

मूळ पेज – HUMUS 

Entrepreneur वेबसाईटने या स्टार्ट-अपविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार, मंजुनाथ टी. एन आणि शिल्पा गोपाल यांनी मिळून 2019 मध्ये हे स्टार्ट-अप सुरू केले होते. 

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने Humus चे संस्थापक मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर केला जाणारा दावा असत्य आहे.

“Humus ही एक खासगी कंपनी आहे. फोटोत दिसणाऱ्या हातगाड्या केवळ देखावा आहे. येथे शेतकरी येऊन भाजी विकत नाहीत. आम्ही शेतकऱ्यांकडून माल विकत घेतो आणि तो आमच्या या सुपरमार्केटमध्ये विकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरू केलेले हे सुपरमार्केट नाही. तसा दावा चुकीचा आहे,” असे त्यांनी सांगितले.

निष्कर्ष

बंगळुरूमधील हे सुपरमार्केट शेतकऱ्यांनी सुरू केलेले नाही. Humus नावाच्या खासगी स्टार्ट-अपचे ते फोटो आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील दावे असत्य आहे.

Avatar

Title:बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचेच सुपरमार्केट सुरू केले का? वाचा या फोटोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False