
चीनची ही मालगाडी असून कझाकिस्तान, रशिया, बेलारुस आणि पोलंड असा 10214 किलोमीटरचा प्रवास करत ती जर्मनीला पोहचते. त्यानंतर जर्मनीवरुन ती परत चीनला जाते. ही रेल्वे 13 जून 2018 ला सुरु करण्यात आली. या रेल्वेगाडीला 200 डबे आहेत. हे डबे वाढवून 300 करण्यात येणार आहेत. ही रेल्वे 10214 किलोमीटरचा हा प्रवास 14 दिवसात पूर्ण करते. समुद्र मार्गाने असा प्रवास करण्यास 60 दिवस लागतात. या रेल्वेचा हा व्हिडिओ पाहा ही रेल्वे डोंगराच्या चारही बाजुने चालते आणि सर्पआकारात दिसते. डोंगराळ भाग असल्याने या रेल्वेगाडीला चार इंजिन जोडावे लागतात. Swapnil Pawar यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ Akash Saxena यांनी अशी माहिती देत शेअर केला आहे. Swapnil Pawar यांचा हा व्हिडिओ स्नेक गेमचा असल्याचे Sachin Baban Bhalerao यांनी म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणीही मालगाडी चीनमधील आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही छायाचित्रे घेत गुगलवर रिव्हर्स सर्च केले. त्यानंतर यांडेक्सवरही ही छायाचित्रे रिव्हर्स इमेज केली. या परिणामात आम्हाला demotywatory.pl या संकेतस्थळावर 2017 मध्ये प्रसिध्द झालेली एक पोस्ट दिसून आली. ही पोस्ट आपण खाली पाहू शकता.
या परिणामातून हा व्हिडिओ चीनमधील नसून अन्य देशातील ही बाब आमच्या लक्षात आली. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. वेगवेगळे शब्दप्रयोग करत हा व्हिडिओ कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा व्हिडिओ कॅलिफोर्नियातील असल्याचे आणि ही रेल्वे म्हणजे Tehachapi Loop असल्याचे दिसून आले. या रेल्वेला अमेरिकेत ऐतिहासिक राष्ट्रीय अभियांत्रिकी लँडमार्क म्हणून घोषित करण्यात आले आहे. tripadvisor.com या संकेतस्थळावर या विषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
युटयूबवरही आम्हाला nabukodinosaure नावाच्या वापरकर्त्याने 26 डिसेंबर 2012 रोजी याविषयी अपलोड केलेला एक व्हिडिओ दिसून आला. 10 मिनिटे 19 संकेदाच हाच व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यांसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ चीनमधील नसून अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील आहे. समाजमाध्यमात वेगवेगळ्या दाव्यासह तो पसरविण्यात येत आहे.
निष्कर्ष
हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा दावा असत्य आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हा व्हिडिओ आहे. TEHACHAPI LOOP हे त्याचे स्थान आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : ही मालगाडी चीनमधील असल्याचा दावा किती सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
