‘संजय राऊत’ यांचा डान्स करतानाचा तो फेक व्हिडिओ पुन्हा व्हायरल

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा वाद विकोपाला जात असताना सोशल मीडियावर निरनिराळे दावे केले जात आहे. त्यातच आता संजय राऊत यांचा डान्स करतानाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ संजय राऊत यांचा नसल्याचे समोर आले. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती परभणीमधील एक पोलिस कर्मचारी आहे.

काय आहे दावा?

संजय राऊत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा ‘हलकट जवानी’ या हिंदी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेयर करून युजर्स म्हणत आहेत की, कंगनाचे घर तोडल्यानंतर संजय राऊत यांनी असा आनंद व्यक्त केला.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना संजय राऊत चर्चेत होते. तेव्हादेखील संजय राऊत यांच्या नावे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा धागा पकडून शोध घेतला असता ‘सकाळ’ वेबसाईटवरील 5 डिसेंबर 2019 रोजीची बातमी आढळली. त्यातील माहितीनुसार, या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती परभणी येथील पोलिस दलातील कर्मचारी आहेत. त्यांचे नाव लक्ष्मण भदरगे आहे. मूळ व्हिडिओमध्ये “घुंगरू पैंजणाचे” हे मराठी गाणे आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने मग परभणीतील लक्ष्मण भदरगे यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यांचाच आहे.

“या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती मीच आहे,” लक्ष्मण भदरगे म्हणाले. “गेल्या वर्षीसुद्धा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा मीडिया आणि पत्रकारांनी माझी मुलाखत घेतली होती.”

भदरगे यांनी फॅक्ट क्रेसेंडोला ‘सकाळ’ वर्तमानपत्रातील एका बातमीचे कात्रण पाठविले.

व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहिती देताना भदरगे यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी माझ्या एका मित्राच्या एका मुलाच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा वरातीमध्ये मी नाचलो होतो त्याचा हा व्हिडिओ आहे. सध्या कोणीतरी मूळ व्हिडिओ एडिट करून त्यात ‘हलकट जवानी’ हे हिंदी गाणे टाकले आणि संजय राऊत म्हणून तो व्हायरल केला. परंतु, हा व्हिडिओ संजय राऊत यांचा नाही.”

लक्ष्मण भदरगे यांनी फॅक्ट क्रेसेंडोकडे एक व्हिडिओ संदेश पाठवून सध्या व्हायरल होत असलेले दावे खोडून काढले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते संजय राऊत नाचत नसून ते परभणीतील लक्ष्मण भदरगे आहेत. 

Avatar

Title:‘संजय राऊत’ यांचा डान्स करतानाचा तो फेक व्हिडिओ पुन्हा व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •