बुरखा घालून पाकिस्तानी झेंडा फडकावताना भाजप कार्यकर्त्याला पकडल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

False सामाजिक

बुरखा घातलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असून, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी त्याने बुरखा घालून पाकिस्तानी झेंड फडकावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले.

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय हे पोस्टमध्ये?

44 सेकंदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये एका बुरखाधारी व्यक्तीला पोलिसांनी पकडलेले आहे. मग तो व्यक्ती बुरखा काढल्यावर तो पुरुष असल्याचे दिसते. या व्हिडियोला कॅप्शन दिले की, बुरखा घालून पाकिस्तानचा झेंडा फडकावताना भाजपचा कार्यकर्ता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ही घटना कुठे झाली याचा शोध घेतला. कीवर्डद्वारे सर्च केल्यावर ई-टीव्ही आंध्र प्रदेश वाहिनीची दोन आठवड्यांपूर्वीची एक बातमी आढळली. त्यानुसार, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामध्ये बुरखा परिधान करून अवैध मद्याची तस्करी करणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यांना पडकले होते तेव्हाचा हा व्हिडियो आहे. बातमीमध्ये या टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या मद्याचीसुद्धा दृश्ये आहेत.

यानुसार, अधिक सर्च केल्यावर कुर्नूलचे पोलिस अधीक्षक फकिरप्पा कगिनेल्ली यांचे एक ट्विट आढळले. त्यात त्यांनी म्हटले की, सदरील व्हिडियो बुरखा घालून मद्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीचा आहे. तेलंगणातून कुर्नूल येथे मद्य तस्करी करताना या तरुणाला पोलिसांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी अटक केली.

अर्काइव्ह

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने कुर्नूलचे पोलिस अधीक्षक फकिरप्पा कगिनेल्ली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, सदरील बुरकाधारी तरुणाकडून 60 पेक्षा अधिक मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा किंवा व्यक्तींचा भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बुरखा घालून अवैध मद्याची तस्करी करणाऱ्या तरुणाला आंध्र प्रदेश पोलिसांनी पकडल्याचा हा व्हिडियो आहे. त्याचा भाजपशी काही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या व्हिडियोसोबत केला जाणारा दावा खोटा आहे.

Avatar

Title:बुरखा घालून पाकिस्तानी झेंडा फडकावताना भाजप कार्यकर्त्याला पकडल्याचा हा व्हिडियो नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False