सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की, संपूर्ण भारतासाठी ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेकरिता 104 क्रमांक सुरू करण्यात आला आहे. रक्ताची गरज असल्यास भारतात कुठूनही या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. 104 हा क्रमांक केवळ महाराष्ट्रात ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेकरिता आहे. संपूर्ण भारतात नाही.

काय आहे दावा?

तथ्य पडताळणी

संपूर्ण भारतात रक्तासाठी 104 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली का याचा शोध घेतल्यावर अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

सर्वप्रथम ब्लड ऑन कॉल ही सेवा काय आहे याचा शोध घेतला. त्याद्वारे कळाले की, 104 क्रमांकाची हेल्पलाईन 2014 साली सुरू करण्यात आली होती. म्हणजेच ही सेवा अलिकडे सुरू झालेली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या 7 जानेवारी 2014 रोजीच्या बातमीनुसार, एका कॉलवर रक्त पुरवठा करण्यासाठी जीवन अमृत सेवा अर्थातच ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेअंतर्गत 104 हा क्रमांक सुरू करण्यात आला होता. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी या सेवेचे उद्घाटन केले होते.

40 किमी अंतरापर्यंत दुचाकीवर गरजवंताना रक्ताचा पुरवठा करण्याची सुविधा याद्वारे देण्यात आली होती. पुण्याच्या औंध सिविल दवाखान्यात कॉल सेंटर उभारण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरदेखील 104 हा क्रमांक ब्लड ऑन कॉल सेवेचा असल्याचे दिलेले आहे.

104 - ब्लड ऑन कॉल सेवा बंद

झी-24 तासच्या बातमीनुसार, ही सेवा सुरू झाल्यानंतर एकाच वर्षांत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अत्याधुनिक सुविधाच नसल्याने फक्त संपूर्ण रक्तच मिळते. प्लेटलेट्स, प्लास्मा असे घटक मिळतच नाहीत. त्यासाठी खासगी रक्तपेढीचाच आधार घ्यावा लागतो, असे प्रकार समोर आले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, राज्यात 104 क्रमांकाची ब्लड ऑन कॉल सेवा बंद करण्यात आली आहे. निधीटंचाईमुळे 1 एप्रिल 2022 पासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले होते.

वेगवेगळ्या राज्यात 104 हेल्पलाईन क्रमांक वेगवेगळ्या सेवेसाठी वापरण्यात येतो. उदाहरणार्थ –

मातृत्व वंदना

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने गेल्या महिन्यात 104 क्रमांक सुरू केला आहे. या सेवेसाठी पूर्वी 7998799804 हा हेल्पलाइन क्रमांक होता.

मेडिकल हेल्पलाईन

तमिलनाडू, गुजरात, गोवा, राजस्थान आणि दमन, दादरा-नगर हवेली येथे 104 हा वैद्यकीय हेल्पलाईन आहे.

आसाम, मध्य प्रदेश व राजस्थान

आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात 104 क्रमांक वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी हेल्पलाईन आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, 104 क्रमांक संपूर्ण भारतात ब्लड ऑन कॉल सेवेसाठी नाही. ही हेल्पलाईन केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित होती आणि आता ती बंद आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भारतासाठी एका कॉलवर रक्त मिळवण्याची 104 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली नाही

Fact Check By: Agastya Deokar

Result: False