पाकिस्तानी सैनिकांनी पांढरा झेंडा घेऊन भारताकडे समर्पण केले का? शेयर करण्यापूर्वी हे वाचा

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू असताना सोशल मीडियावर याविषयी विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. यापैकी एक म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांसमोर समर्पण केल्याचा फोटो फिरवला जात आहे. कथितरीत्या हातात पांढरा झेंडा घेऊन काही पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर हार मानल्याचा दावा या फोटोसोबत केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबक

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेल्या फोटोची सत्यता तपासण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. हा फोटो विविध वेबसाईटवर शेयर केल्याचे आढळले. त्यानुसार हा फोटो पाकिस्तानी सैनिकांनी समर्पण केल्याचा नाही. काश्मीरमधील वरिष्ठ पत्रकार आदित्य राज कौल यांनी 11 जुलै रोजी हा फोटो सर्वप्रथम शेयर केला होता. तो तुम्ही खाली दिलेल्या ट्विटमध्ये पाहू शकता. 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनगंगा नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलाचा मृतदेह पाकिस्तानी सैनिकांकडे सुपूर्द करतानाचा हा फोटो आहे. अबिद शेख असे या पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या मुलाचे नाव आहे. शाळेतून घरी येताना तो पाय घसरून किशनगंगा नदीमध्ये पडला होता. बुडाल्यानंतर त्याचा मृतदेह वाहत वाहत भारतीय सीमेत आला. भारतीय सैनिकांनी मृतदेह पाण्यातून काढून प्रोटोकॉल न पाळता मानवतेच्या दृष्टीकोनातून मृतदेह पाकिस्तानला परत केला होता. यावेळीचे विविध फोटो तुम्ही या ट्विटमध्ये पाहू शकता.

अर्काइव्ह

द काश्मीर पल्स वेबसाईटवरील बातमीत, बांदीपुरा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक राहुल मलिक यांनी मृतदेह सुपूर्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की,  पोस्ट मॉर्टम केल्यानंतर गुरेझ येथील दुदगाई पोस्टपाशी भारतीय सैनिकांनी सात वर्षीय मुलाचा मृतदेह 11 जुलै रोजी दुपारी दीड वाजता पाकिस्तानी सैनिकांकडे सुपूर्द केला.

अर्काइव्ह

भारतीय सैन्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या घटनेचे फोटो आणि व्हिडियो शेयर करण्यात आले होते. त्यातील माहितीनुसार, अच्चुरा गावापाशी बुरझील नाला येथे 9 जुलै रोजी मृतदेह सापडला होता. भारतीय सैन्याने तत्परतेने या मुलाची ओळख पटवून पाकिस्तानी आर्मीला याची माहिती दिली. मृतदेह परत करण्यासाठी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांची मदत घेण्यात आली.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, मृत मुलगा गिलगीत बलुचिस्तान भागातील मिनीमार्ग अस्तूर येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव नझीर अहमद शेख आहे. पाकिस्तानी सैनिकांनी मृतदेह परत घेण्यास नकार दिला. परंतु, मृत मुलाच्या कुटुंबियांनी पंतप्रधान इम्रान खान यांना मृतदेह परत आणण्याची व्हिडियो संदेशाद्वारे विनंती केली. त्यानंतर पाकिस्तानने मृतदेह स्वीकारला.

या संपूर्ण घटनेचा सविस्तर वृतांत आणि फोटो तुम्ही फ्री काश्मीर प्रेस येथे पाहू शकता.

मग या पांढऱ्या झेंड्याचा काय संदर्भ?

दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत पाकीस्तानचे काही सैनिका मारले गेले. त्यांचे काही मृतदेह केरन सेक्टर भागात पडून आहेत. त्याचे फोटो 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानला सूचना केली की, पांढरा झेंड घेऊन या आणि ते मृतदेह घेऊन जा. सविस्तर बातमी येथे वाचा – न्यूज-18

याचा आणि फेसबुकवरील व्हायरल फोटोचा काही संबंध नाही. 

निष्कर्ष

वरील पुराव्यांवरून सिद्ध होते की, सदरील फोटो पाकिस्तानी सैनिकांनी भारताकडे समर्पण केल्याचा नाही. किशनगंगा नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलाचा मृतदेह पाकिस्तानी सैनिकांकडे सुपूर्द करतानाचा हा फोटो आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या या पोस्टवर विश्वास ठेवू नका

Avatar

Title:पाकिस्तानी सैनिकांनी पांढरा झेंडा घेऊन भारताकडे समर्पण केले का? शेयर करण्यापूर्वी हे वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False