सध्या सोशल मीडियावर एका राम मंदिराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मंदिरातील नक्षीकाम आणि श्री रामाची चित्रे दिसतात.

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राम मंदिर अयोध्या चे आंतील दृश्य.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ जर आयोध्येतील राम मंदिराचा असता तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी आढळली नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘नागपूर एक्सपीरियंस’ असे नाव दिसते.

शोध घेतल्यावर कळाले की, नागपूर एक्सपीरियंस या युट्यूब चॅनलने 8 जुलै 2023 रोजी हा अपलोड केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नागपुरच्या कोराडीमधील राम मंदिर.”

https://youtu.be/WxLD722335M?si=5lil2uH_SJ29Iuzo

तसेच याच युट्यूब चॅनलवर या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे.

https://youtu.be/TZT13VHKiwY?si=nCSrTYZH4sh4cimK

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, व्हिडिओमध्ये दाखवलेली जागा ‘रामायण सांस्कृतिक केंद्र’ असून 5 जून रोजी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रामायणातील प्रसंग 108 चित्रांच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. तर दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेली चित्रमालिका भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित आहे. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

मूळ पोस्ट – एबीपी माझा

अयोध्या राम मंदिर

लोकसत्ताच्या बातमीनुसार आयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीचे काम अद्याप सुरू आहे. 2024 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

तसेच 21 - 23 जानेवारी 2024 मध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडे सोपवलेली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी 14 सप्टेंबर रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवरून मंदिर उभारणीच्या कामाचा व्हिडिओ शेअर केला होता.

https://twitter.com/ChampatRaiVHP/status/1702167799177887908?s=20

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. हा नागपुरच्या कोराडीमधील रामायण सांस्कृतिक केंद्रचा व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमध्ये दाखविलेले राम मंदिर खरंच अयोध्येचे आहे का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Missing Context