
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एका वृत्तपत्राचे कात्रण समाजमाध्यमांमध्ये सध्या पसरत आहे. या कात्रणासोबतच 1987 मध्ये एका 19 वर्षाच्या एका आयआयटी विद्यार्थ्याने बलात्कार केला होता. तो विद्यार्थी आता मुख्यमंत्री देखील आहे. याची कोणाला माहिती आहे का, कोणी सांगेल का, असे म्हटलेले आहे. या वृत्तपत्राच्या कात्रणावर सोमवार 8 जून 1987 अशी तारीखही दिसून येते. या वृत्तपत्राच्या कात्रणात या विद्यार्थ्याचे नाव अरविंद केजरीवाल असल्याचेही आपण पाहू शकतो. सुभाष देवधर यांनी ही माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कधीकाळी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता का हे जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त आम्हाला आढळून आले नाही. त्यानंतर हे वृत्त द टेलिग्राफ या वृत्तपत्रातील असण्याची शक्यता असल्याने आम्ही या वृत्तपत्राच्या संकेतस्थळास भेट दिली. या संकेतस्थळावरील 8 जून 1987 रोजी प्रसिध्द झालेल्या बातम्यामध्येही असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. द टेलिग्राफच्या Archive मध्येही हे वृत्त आढळून आले नाही. हे वृत्त मग इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या टूलच्या सहाय्याने तर बनविण्यात आले नाही ना, असा प्रश्न आम्हाला पडला. इंटरनेटवर शोध घेतला असता आम्हाला अशाच पध्दतीचे वृत्त एका संकेतस्थळावर दिसून आले.
अरविंद केजरीवाल यांच्याबाबतचे हेच कात्रण 2016 मध्येही समाजमाध्यमांमध्ये पसरले होते. त्यावेळी द लंलनटॉप या संकेतस्थळाने याचे फॅक्ट चेक केले होते.
निष्कर्ष
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याचे वृत्तपत्राचे कात्रण हे वृत्तपत्र कात्रण तयार करणाऱ्या एका संकेतस्थळाच्या सहाय्याने बनविण्यात आले आहे. हे कात्रण असत्य माहितीच्या आधारे बनवून समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : केजरीवाल यांच्यावर 1987 मध्ये बलात्काराचा आरोप झाल्याचे असत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
