प्रणव मुखर्जींनी खरंच सोनिया गांधींना गुलाम पसंत असल्याचे त्यांच्या पुस्तकात म्हटले का?

False राजकीय

सोनिया गांधींना गुलाम पसंत असल्याचे खळबळजनक वक्तव्य माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. नरेंद्र मोदी सरकारची स्तुती केल्यामुळे सोनिया गांधीं त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या. यानंतर एका भेटीचे उदाहरण पोस्टमध्ये देण्यात येते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

प्रणव मुखर्जी यांनी कथितरित्या त्यांच्या पुस्तकात लिहिले की, मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर मी जेव्हा त्यांच्या कार्याची स्तुती केली तेव्हा सोनियाजी माझ्यावर नाराज झाल्या होत्या. संसदेत अभिभाषण केल्यानंतर एकदा आम्ही एकमेकांसमोर आलो होतो. त्यांच्यासोबत आलेल्या गुलाब नबी आझाद आणि मणीशंकर अय्यर यांनी मला नमस्कार केला. पण सोनिया गांधींना वाटत होते की, मी त्यांना प्रथम होऊन नमस्कार करावा. त्या विसरल्या होत्या की, त्या प्रणव मुखर्जी नाही तर राष्ट्रपतींसमोर उभ्या आहेत. ही गोष्ट माझ्या मनाला खूप टोचली. त्या भारताच्या प्रथम नागरिकाचा सन्मान करू इच्छित नाही, त्यांना गुलाम पसंद आहेत. आणि मला याच गुलामगिरीतून मुक्त व्हायचे होते.

पोस्टमध्ये म्हटले की, कदाचित यामुळेच प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असावे.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या पुस्तकात कथित वक्तव्य केले हे दिलेले नाही. त्यामुळे आम्ही पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो इंदिरा गांधी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त 19 नोव्हेंबर 2016 रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमातील आहे. यामध्ये प्रणव मुखर्जी, गुलाम नबी आझाद आणि मणीशंक्कर अय्यर एकमेकांना अभिवादन करत आहेत तर, सोनिया गांधी तेथे उभ्या आहेत. या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी यांनी भाषणदेखील केले. ते तुम्ही पीआयबी इंडियावर पाहू शकता आणि येथे वाचू शकता.

मूळ फोटो येथे पाहा – इंडिया वेस्ट

पोस्टमध्ये म्हटले की, अभिभाषणानंतर प्रणव मुखर्जींची संसदेत सोनिया गांधीची भेट झाली होती. परंतु, विज्ञान भवन संसदेपासून सुमारे दोन किमी दूर आहे. तसेच राष्ट्रपतींच्या वेबसाईटवरील माहितीनुसार प्रणव मुखर्जींनी 19 नोव्हेंबर 2016 रोजी केवळ विज्ञान भवन येथे भाषण केले होते. त्यावर्षी त्यांनी संसदेतील अभिभाषण 23 फेब्रुवारी 2016 रोजी केले होते. म्हणजे वरील फोटो पोस्टमधील कथित दाव्याचा नाही.

मग प्रणव मुखर्जींनी कोणत्या पुस्तकात सोनिया गांधींविषयी असे लिहिले?

पोस्टमध्ये म्हटले की, प्रणव मुखर्जींनी मोदी सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरीचे कौतुक केले होते. म्हणजे 2015 नंतर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये त्यांनी कदाचित असे लिहिलेले असावे. 2015 नंतर त्यांची The Turbulent Years: 19801996 (2016) आणि The Coalition Years: 1996-2012 (2017) ही पुस्तके प्रकाशित झाली.

दोन्ही पुस्तकं रुपा पब्लिकेशन या प्रकाशनगृहाने प्रसिद्ध केलेली आहेत. त्यांच्या वेबसाईटवरील माहिती आणि पुस्तकांच्या नावावरून हे स्षष्ट होते की, या पुस्तकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वीच्या (2012) कारकीर्दीविषयी लिहिलेले आहे. त्यामध्ये मोदी सरकारची स्तुती आणि त्यातून ओढावलेली सोनिया गांधी यांची नाराजी याचा उल्लेख करण्याचा संबंधच येत नाही.

रुपा पब्लिकेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, प्रणव मुखर्जी यांचे The Presidential Years हे आगामी पुस्तक त्यांच्या राष्ट्रपती कार्याकाळाविषयीचे असेल. हे पुस्तक डिसेंबर 2018 मध्ये प्रकाशित करण्यात येईल असे 12 जून 2018 रोजी ट्विट करून माहिती देण्यात आली होती. परंतु, हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने रुपा पब्लिकेशनला संपर्क साधून याची पुष्टी केली. म्हणजे या अप्रकाशित पुस्तकातील मजकुर बाहेर कसा येईल?

अर्काइव्ह

निष्कर्ष

प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळाविषयी लिहिलेले पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. त्यांनी इतर पुस्तकांमध्येदेखील पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सोनिया गांधींबद्दल तसे वक्तव्य केलेले नाही. तसेच दिलेला फोटो पोस्टमधील दाव्याशी मेळ खात नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:प्रणव मुखर्जींनी खरंच सोनिया गांधींना गुलाम पसंत असल्याचे त्यांच्या पुस्तकात म्हटले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False