संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन गदारोळ सुरू आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही दिसले. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणीदेखील केली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे ज्याद्वारे दावा केला जात आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सावरकरांबद्दल अपशब्द वापरले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी अंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांचा अपमान केला नव्हता.

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “स्वतंत्र वीर सावरकर माफीवीर होते, स्वतंत्र वीर सावरकर समलैंगिक होते, स्वतंत्र वीर सावरकर स्वतंत्रलढ्यात लढले नव्हते.”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितता की, “फडणवीस सावरकरांबद्दल इतके विखारी बोलतील असे वाटले नव्हते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह | ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलत आहेत.

हा धागा पकडून कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, 2 ऑगस्ट 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात ते सावरकरांबद्दल बोलत होते. अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षने संभाजी भिडे यांनी महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती.

या अधिवेशनचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र विधानसभेने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनल वरून केले होते.

https://www.youtube.com/live/_7bmYdOgiI0?feature=share&t=10899

संपूर्ण भाषण पाहिल्यानंतर लक्षात येते की, देवेंद्र फडणवीस यांनी कुठे ही सावरकरांबद्दल अपशब्द वापरले नाहीत.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर निवेदन सादर करताना फडणवीस म्हणातात की, “संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वासाटी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडतात. हे चांगले कार्य आहे. पण तरीही त्यांना महापुरुषांबाबत, असे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. कोणालाही असा अधिकार दिलेला नाही. कोणीही महापुरुषांबाबत अवमानजक वक्तव्य केले तर त्यांच्यावर कारवाई होईल. वीर सावरकर यांच्याबाबतही आक्षेपार्ह लिखाण केले जात आहे. काँग्रेसच्या 'शिदोरी' या मुखपत्रातून वीर सावरकर यांना माफीवीर म्हटले जाते. सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हते, असे या मुखपत्रात म्हटले आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरी मुखपत्रावरही कारवाई केली जाईल, गुन्हा दाखल होईल.”

सरदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=j86_M70o4kk

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नव्हते. ते काँग्रेसच्या मुखपत्रातून सावकरांबद्दल काय लिहिले जाते हे सांगते होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना समलैंगिक म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered