पाणी साचलेल्या विमानतळाचा फोटो अहमदाबादचा नाही; चेन्नईतील जुना फोटो व्हायरल

राजकारण | Politics राजकीय

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पूराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. अमहदाबाद विमानतळालासुद्धा जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले होते. 

दरम्यान, विमानतळावर पाणी साचल्याचा एक फोटो शेअर करून दावा करण्यात येत आहे की तो फोटो अहमदाबाद विमानतळाचा हे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो अहमदाबाद येथील नसून चेन्नई विमानतळावरील आहे. 

काय आहे दावा ?

पाण्यात उभ्या असणाऱ्या विमानांचा फोटो शेअर करून महाराष्ट्र मंथन पोर्टलने बातमी प्रसिद्ध केली की, “ गुजरात मॉडेल ‘अहमदाबाद एअरपोर्ट’चे बनले ‘बंदर’!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. 2017 साली हाच फोटो अहमदाबाद विमानळाच्या नावाने प्रसिद्ध झाला होता. 

स्क्रोल इनच्या वेबसाईटनुसार, पीटीआय वृत्तसंस्थेने चुकीच्या कॅप्शनसह हा फोटो शेअर केल्यामुळे अशी खोटी माहिती पसरली होती. हा फोटो खरं तर चेन्नईचा आहे. 2015 साली चेन्नईमध्ये अतिवृष्टीमुळे असे पाणी साचले होते.

तत्कालीन माजी प्रसारण मंत्री आणि सध्याच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट करत पीटीआयच्या चुकीच्या पोस्टवर संताप व्यक्त केला होता. 

स्मृती इराणींनी ट्विट केले होते की, हा फोटो अहमदाबादचा नसून चेन्नई विमानतळाचा आहे.

त्यानंतर पीटीआयने स्मृती इराणी यांच्या ट्विटला उत्तर देताना माफी मागितली आणि त्या फोटोग्राफरला बडतर्फ केल्याची माहिती दिली.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला पाणी साचलेल्या विमानतळाचा फोटो अहमदाबादचा नसून 2015 साली चेन्नईमध्ये आलेल्या पूराचा आहे. चुकीच्या दाव्यासह विमानतळाचा जुना फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाणी साचलेल्या विमानतळाचा फोटो अहमदाबादचा नाही; चेन्नईतील जुना फोटो व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: False