
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी खोट्या दाव्यासह एक आक्षेपार्ह फोटो शेयर केला जात आहे. सदरील कृष्णधवल छायाचित्रामध्ये एक युवती फोटोग्राफर्सना ग्लॅमरस पोझ देताना दिसते. दावा करण्यात येत आहेत की, सोनिया गांधी तरुणपणी डान्सबारमध्ये काम करीत असतानाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लगेच कळते की, हा फोटो सोनिया गांधी यांचा नाही. हा फोटो तर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरो यांचा आहे. पन्नासच्या दशक गाजविणाऱ्या या सौंदर्यवती अभिनेत्रीचे जगभरात नाव आहे.
डेव्हिड विल्स लिखित “मार्लिन: इन द फ्लॅश” या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मूळ छायाचित्र वापरण्यात आले आहे. प्रसिद्ध प्रकाशन कंपनी हार्पर्स कॉलिन्सतर्फे प्रकाशित या पुस्तकात मार्लिन मुनरो यांच्या दुर्मिळ आणि आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या छायाचित्रांचा संग्रह आहे. तसेच त्यांच्याविषयीच्या अज्ञात गोष्टी, मुलाखती, मीडियामधील छबी अशा विविधअंगांनी प्रकाश टाकलेला आहे.

मूळ वेबसाईटला भेट द्या – हार्पर्स कॉलिन्स
मूळात हा फोटोशुट ‘द सेव्हन ईयर इच’ (1955) चित्रपटातील प्रसिद्ध ‘स्कर्ट सीन’च्या वेळी करण्यात आला होता. या फिल्ममध्ये मुनरोसहित टॉम ईवेल याची प्रमुख भूमिका होती. हा सीन तुम्ही येथे पाहू शकता. ही सीन चित्रित करतेवेळीचे इतर फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, सदरील फोटो सोनिया गांधी यांचा नाही. मार्लिन मुनरो यांच्या फोटोला एडिट करून त्यावर सोनिया गांधी यांचा चेहरा लावण्यात आला. खाली दोन्ही फोटोंची तुलना केलेली आहे. यावरून दोघांमधील फरक लगेच लक्षात येईल. त्यामुळे अशा खोट्या पोस्टवर विश्वास ठेवून नये. आपल्याकडेदेखील असे शंकास्पद फोटो, व्हिडियो किंवा मेसेजेस असतील ते आम्हाला व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवा. फॅक्ट क्रेसेंडोकडून त्याची सत्य पडताळणी करण्यात येईल.


Title:हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरोचा फोटो एडिट करून सोनिया गांधी यांच्या नावे व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
