World Cup Fact: धोनी आऊट झाल्यामुळे हा फोटोग्राफर रडला नव्हता. जाणून घ्या यामागचे सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे तमाम चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. न्यझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय स्टार फलंदाजांनी टांगी टाकली. शेवटी रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. परंतु, ऐन मोक्याची ठिकाणी धोनी धावचीत झाला आणि वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. 

या पार्श्वभूमीवर डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दावा केला जात आहे की, धोनीची विकेट पडल्यावर मैदानात उपस्थित असलेल्या या फोटोग्राफरला स्वतःच्या भावना आवरता आल्या नाही आणि आपसूकच त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

सकाळ माध्यम समुहाच्या सकाळ स्पोर्ट्स या वेबसाईटवरील बातमीची लिंक फेसबुकवर शेयर करण्यात येत आहे. मॅच हारली…धोनी रडला…मग ‘तो’ही रडू लागला…! असे शीर्षक असलेल्या बातमीत म्हटले की, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धोनी धावचीत झाला तेव्हा सामन्याचे फोटो काढणारा एक फोटोग्राफर ढसाढसा रडू लागला. धोनीला आऊट झाल्याचे पाहून या फोटोग्राफरला अश्रु आवरता आले नाही. ही बातमी त्या वृत्तसंस्थेचा दाखला देऊन देण्यात आली आहे. सोबत एका युजरने हा फोटो शेयर केलेले ट्विटदेखील देण्यात आले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळ स्पोर्ट्सअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

भारतीय क्रिकेट संघाला सर्वोच्च शिखरावर नेण्याऱ्या लाडक्या धोनीचा हा शेवटचा विश्वचषक असल्याची चाहत्यांना कल्पना असल्यामुळे त्याचे आऊट होणे मनाला चटका लावणारे होते. त्याच्या विकेटचा धसका घेऊन कोलकात्यातील एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमीसुद्धा आली. मग धोनी आऊट झाल्यावर हा फोटोग्राफर खरंच रडला का?

याचे उत्तर शोधण्यासाठी पोस्टमध्ये दिलेला फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यातून इंडोस्पोर्ट नावाची एक इंडोनेशियन वेबसाईट समोर आली. या वेबसाईटवरील 29 जानेवारी 2019 रोजीच्या लेखात या रडणाऱ्या फोटोग्राफरचे छायाचित्र आहे. गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने मिळालेल्या माहितनीनुसार, या फोटोत दिसणाऱ्या छायाचित्रकाराचे नाव मोहम्मद अल-अझ्झावी आहे. तो इराक देशातील आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या एशियन फुटबॉल कप स्पर्धेत कतारकडून इराकी संघाचा पराभव झाला होता. हा पराभव पाहून तेथे उपस्थित असलेला छायाचित्रकार मोहम्मद रडला होता. त्याचे हे छायाचित्र त्यावेळी प्रचंड गाजले होते.

मूळ बातमी येथे पाहा – इंडोस्पोर्टअर्काइव्ह

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. यूएई येथे 5 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एएफसी एशियन कप 2019 ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या 24 संघामध्ये इराकचादेखील संघ होता. 22 जानेवारी रोजी इराक आणि कतार यांच्यामध्ये सामना झाला. कतारने सामन्यात 1-0 अशी बाजी मारली. या सामन्याच्यावेळी छायाचित्रकार मोहम्मद अल-अझ्झावी मैदानात उपस्थित होता. 

अर्काइव्ह

एशियन कप स्पर्धेच्या अधिकृत अकाउंटवरूनदेखील हा फोटो शेयर करण्यात आला होता. अंतिम 16 संघाच्या फेरीत पराभव झाल्यावर हा इराकी छायाचित्रकार भावनिक झाला, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच फुटबॉल ट्विट नावाच्या एका अकाउंटवरून या छायाचित्रकाराचे इतर फोटोही शेयर करण्यात आले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

पत्रकार स्टीव्हन नबिल यांनीसुद्धा मोहम्मदचा फोटो ट्विट करून माहिती दिली होती की, आपल्या संघाचा पराभव झाल्यानंतर इराकचा क्रीडा छायाचित्रकार मोहम्मद अल-अझ्झावी याने पाणावलेल्या डोळ्यांनी काम पूर्ण केले. जगासाठी फुटबॉल केवळ खेळ असेल; परंतु इराकसाठी फुटबॉल सर्वकाही आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

धोनी आऊट झाला म्हणून रडणाऱ्या ज्या छायाचित्रकाराचा फोटो व्हायरल होत आहे, तो मूळचा इरकाचा फोटोग्राफर आहे. त्याचे नाव मोहम्मद अल-अझ्झावी आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात एशियन फुटबॉल कप स्पर्धेत कतारकडून इराकचा पराभव झाल्यानंतर मोहम्मदला अश्रु आवरता आले नव्हते. त्यामुळे ही बातमी असत्या आहे.

Avatar

Title:World Cup Fact: धोनी आऊट झाल्यामुळे हा फोटोग्राफर रडला नव्हता. जाणून घ्या यामागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False