ELECTRIFYING FACT: काँग्रेस सरकारने राजस्थानमध्ये विजेचे दर युनिटमागे दोन रुपयांनी वाढविले का?

False राजकीय | Political

राजस्थानमध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेसने डिसेंबर 2018 मध्ये सत्ता मिळवली. अशोक गेहलोत राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारने सत्तेत येताच राजस्थानमध्ये विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. प्रतियुनिट 7 रुपये असणारे दर आता 9 रुपये करण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये काय आहे

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत विजयी मुद्रेत उभे आहेत. सोबत लिहिले की, राजस्थान मे काँग्रेस सरकारद्वारा बिजली 7 रुपये प्रति युनिट से बढाकर 9 रुप प्रतियुनिट करने पर प्रदेशवासियों को हार्दिक बधाई.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम गुगलवर राजस्थान सरकारने खरंच असा काही निर्णय घेतला का याचा शोध घेतला. तेव्हा राजस्थानमध्ये अलिकडच्या काळात वीजदरामध्ये वाढ केल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. त्यामुळे पोस्टच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होते.

राजस्थानमध्ये विजेचे दर किती आहेत हे शोधले. बिजली बचाओ वेबसाईटवर देशातील विविध राज्यांमध्ये वीजदर कसे आहेत याची येथे माहिती देण्यात आली आहे. यानुसार राजस्थानमध्ये 501 युनिटपेक्षा पुढे वीज वापर केल्यास 7.15 रुपये प्रतियुनिट दर लागू होतात. हे दर 28 मे 2018 रोजीच्या आदेशानुसार असल्याचे येथे नमुद केले आहे.

मूळ वेबसाईटला येथे भेट द्या – बिजली बचाओ

हा धागा पकडून राजस्थान विद्युत नियामक आयोगाच्या (RERC) वेबसाईटवर सदरील आदेश शोधला. वेबसाईटवरील दर (Tariff) सेक्शनमध्ये वीजदरासंबंधीचे आदेश प्रसिद्ध केले जातात. येथे दरासंबंधीचा शेवटचा आदेश 28 मे 2018 रोजी जाहीर केल्याचे आढळले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये घरगुती वापरासाठी 500 युनिटच्या वर 7.15 रुपये प्रतियुनिट वीजदर आहे. हाच दर सध्या राजस्थानमध्ये लागू आहे. राजस्थानमध्ये सध्या 50 युनिटर्यंत 3.85 रुपये, 50 ते 150 युनिटदरम्यान 6.10 रुपये, 150 ते 300 दरम्यान 6.40 रुपये आणि 300 ते 500 दरम्यान 6.70 रुपये दर आहे.

मूळ आदेश येथे वाचा – RERC Tariff Order 2018अर्काइव्ह

जयपूर विद्युत वितरण निगमच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील वरील टॅरिफ आदेशाप्रमाणे वीजदर लागू केलेले आहेत. येथेदेखील हाच शेवटचा आदेश दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हेच दर कायम राहतील असेही जयपूर विद्युत वितरणने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. याचा अर्थ की राजस्थानमध्ये अलिकडच्या काळात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

मूळ आदेश – जयपूर विद्यूत टॅरिफ ऑर्डर

निष्कर्ष

राजस्थान विद्युत नियामक आयोगाने अलिकडच्या काळात वीज दरवाढ केलेली नाही. सध्या राजस्थानमध्ये 500 च्या पुढे प्रतियुनिट 7.15 रुपये दर लागू आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने तेथे 7 रुपयांवरून दर वाढवून 9 रुपये केल्याची माहिती असत्य आहे.

Avatar

Title:ELECTRIFYING FACT: काँग्रेस सरकारने राजस्थानमध्ये विजेचे दर युनिटमागे दोन रुपयांनी वाढविले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False