
नीट परीक्षा पेपरफुटीवरुन विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनाला काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली होती.
याच पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला समर्थन दिल्याचा दावा करत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन (9049053770) पाठवून त्यांची पडताळणी करण्याची विनंती केली.
तपासादरम्यान आढळले की, व्हिडिओंसोबत करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल व्हिडिओ जुने असून असून त्यांचा दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
आम्ही प्रत्येक व्हिडिओची रिव्हर्स इमेज सर्च आणि उपलब्ध मूळ स्रोतांच्या आधारे पडताळणी केली.
व्हिडिओ क्रमांक 1

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
दावा : जोसेफ विजय जंतर-मंतरवर आंदोलनात सहभागी झाले.
सत्य : हा व्हिडिओ चेन्नईतील नुंगमबक्कम परिसरातील लॉयोला कॉलेजजवळचा आहे. बालकलाकार हर्षिता कार्तिक हिने 4 मे रोजी हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे हा व्हिडिओ जंतर-मंतरचा नसल्याचे स्पष्ट होते.
व्हिडिओ क्रमांक 2

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
दावा : जोसेफ विजय आंदोलनस्थळी पोहोचल्याचा व्हिडिओ.
सत्य : हा व्हिडिओ तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये पक्षाच्या विजयानंतर 4 मे रोजी लॉयोला कॉलेजमध्ये आमदारकीचे प्रमाणपत्र स्वीकारताना चित्रित करण्यात आला होता. त्याचा दिल्लीतील आंदोलनाशी कोणताही संबंध नाही.
अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
व्हिडिओ क्रमांक 3

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
दावा : जोसेफ विजय यांनी जंतर-मंतरवर जनतेचे अभिवादन केले.
सत्य : हा व्हिडिओ 21 एप्रिल रोजी चेन्नईतील सैदापेट येथे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या रोड शोचा आहे. ‘सीएनबीसी टीव्ही-18’च्या थेट प्रक्षेपणातही हा प्रसंग दिसून येतो. म्हणजेच हा व्हिडिओ सीजेपी आंदोलनाच्या आधीचा आहे.
व्हिडिओ क्रमांक 4

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
दावा : जंतर-मंतरवरील आंदोलनात मुख्यमंत्री विजय यांची उपस्थिती.
सत्य : हा व्हिडिओ चेन्नईच्या पेरंबूर परिसरातील दौऱ्याचा आहे. पत्रकार वीरा यांनी 13 जुलै रोजी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच दौऱ्याचा व्हिडिओ इंडिया टुडेनेही यूट्यूबवर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओही जंतर-मंतर आंदोलनाचा नाही.
निष्कर्ष
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सर्व व्हिडिओ जुने आहेत. ते चेन्नईतील विविध कार्यक्रम, निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक दौऱ्यांदरम्यानचे आहेत. या व्हिडिओंचा दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपी आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.


