
महात्मा गांधी यांच्या विटंबना झालेल्या पुतळ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत असा दावा केला जात आहे की, ही घटना बांग्लादेशमध्ये घडली आहे. भारत-बांग्लादेश तणावाच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशातील लोकांनी गांधीजींचा पुतळा तोडल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल पोस्टमध्ये अतिशय भडक आणि दिशाभूल करणारा मजकूर लिहून हा फोटो शेअर केला जात आहे.

फॅक्ट चेक
तपासाची सुरुवात करताना आम्ही व्हायरल फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यामध्ये ही घटना पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती समोर आली.
एबीपी न्यूज आनंदाच्या रिपोर्टनुसार, १५ जानेवारी रोजी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चाकुलिया येथे गोलपोखर BDO कार्यालयात आंदोलनादरम्यान गांधीजींचा पुतळा तोडण्यात आला.
मतदार यादीतील त्रुटींविरोधात आणि सुमारे ६९,००० मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावण्याच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन सुरू झाले होते. पुढे हे आंदोलन हिंसक बनले.
या दरम्यान आंदोलकांनी तोडफोड आणि आगजनी केली. गांधीजींच्या पुतळ्याचे नुकसान करण्यात आले आणि त्यांचे शिर वेगळे करण्यात आले. तसेच कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचरला आग लावण्यात आली आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही करण्यात आली.

या घटनेत चाकुलिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासह किमान सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
या घटनेबाबत डिजिटल बांग्ला, टीवी 19 बांग्ला, जी 24, एबीपी आनंदा यांसारख्या माध्यमांतही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
निष्कर्ष
तपासातून स्पष्ट होते की गांधीजींच्या शिरच्छेद झालेल्या पुतळ्याचा हा व्हायरल फोटो बांग्लादेशचा नाही. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.


