
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी आरसीबी चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर एका उत्साहित जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल जिंकल्यानंतरचे सेलिब्रेशन आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्पेनमधील एका उत्सवाचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव उत्साहात गाताना आणि उड्या मारताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “सेलिब्रेशन असा असावा, टाटा आयपीएल 2025 जिंकल्याबद्दल आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघाचे अभिनंदन! खरोखरच एक ऐतिहासिक विजय!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ आरसीबीशी संबंधित नाही.
पॅम्प्लोना फिएस्टा नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 2 जानेवारी 2024 रोजी शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “च्यूपिनाझो हा स्पेनमधील पाम्प्लोना शहरात “बुल रन” सप्ताहाची सुरुवात करणारा उद्घाटन समारंभ आहे.”
मूळ पोस्ट – युट्यूब
हा धागा पकडून अधिक सर्च कळाले की, सॅन फर्मिन हा स्पेनच्या उत्तर भागातील पाम्प्लोना शहरात दरवर्षी साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध पारंपरिक उत्सव आहे. दरवर्षी हा उत्सव शहराच्या संरक्षक संत फर्मिन यांचा सन्मान करण्यासाठी 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान आयोजित केला जातो. या उत्सवातील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे “बैल शर्यत” यात लोक बैलांच्या पुढे धावत शहरातील रस्त्यांवरून जातात. या आठवड्या भराच्या उत्सवात लोक मिरवणुका, फटाके, संगीत, नृत्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आनंद घेतात. जगभरातून हजारो पर्यटक हा उत्सव अनुभवण्यासाठी पाम्प्लोना शहरात येतात. अधिक माहिती आपण येथे, येथे, येथे व येथे वाचू शकता.
पुढे गुगल मॅपवर सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओमधील इमारत आढळली. स्पेनच्या पॅम्प्लोना शहरामधील टाउन हॉल भागातील या इमारतीला ‘सिटी कौन्सिल’ म्हणून ओळखले जाते.
मूळ पोस्ट – गुगल मॅप
आरसीबी सेलिब्रेशन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएलचा चषक उंचावल्यानंतर बंगळुरूत विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी तुफन गर्दी केली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी होऊन 11 जण दगावले, तर 47 जण जखमी झाले आहेत. त्या दिवशी एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयाचे सेलिब्रेशन चालू होते; तर दुसरीकडे स्टेडियमबाहेर शोकाकूल व भीतीचे वातावरण होते. अधिकर महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ आरसीबी सेलिब्रेशनचा नसून स्पेनमधील सॅन फर्मिन उत्सवादरम्यान होणाऱ्या ‘च्यूपिनाझो’ उद्घाटन समारंभाचा आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:आरसीबी सेलिब्रेशन म्हणून स्पेनमधील सॅन फर्मिन उत्सवाचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
